Rakhi Sawant : राखी सावंतचा ड्रामा सुरुच; आता म्हणाली, 'मी घटस्फोट देणार नाही अन् माझ्या आयुष्याशी...'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 11:02 AM2023-02-15T11:02:16+5:302023-02-15T11:03:33+5:30
राखीने पती आदिलवर मारहाण आणि फसवणुकीचे आरोप लावले आहेत.
ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिच्या आयुष्यात आलेल्या वादळामुळे चर्चेत आहे. आधी आईचे निधन आणि आता पती आदिलवर आरोप यामुळे ती सतत प्रकाशझोतात असते. राखीसुद्धा या सगळ्या भानगडीत प्रचंड फुटेज खाण्याच्या प्रयत्नात असते. राखीने पती आदिलवर मारहाण आणि फसवणुकीचे आरोप लावले आहेत. राखीच्या तक्रारीवरुनच आदिलला अटक करण्यात आली असून गेल्या एक आठवड्यापासून तो तुरुंगात आहे. मात्र आदिलला घटस्फोट देणार नाही असा खुलासा राखीने केला आहे.
राखीचा पती आदिल खानचे लग्नानंतर दुसऱ्या महिलेसोबत अफेअर होते. आदिलने राखीला मारहाण केली तसेच तिचे पैसेही लुटल्याचा आरोप राखीने केला आहे. आदिल तुरुंगात असून त्याला जामीन मिळू नये म्हणून राखी पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. नवीन व्हिडिओत राखीने आदिलला घटस्फोट देणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. राखी म्हणाली, 'मी मरेन पण आदिलला घटस्फोट देणार नाही. कोणीच माझ्या आयुष्याशी खेळू शकत नाही. मी मरेपर्यंत लढेन. पण मी घटस्फोट देणार नाही.'
इतकंच नाही तर राखी पुढे म्हणाली, 'जर मला पोटगीच घ्यायची असती तर मी पहिल्या पतीकडूनही घेतली असती. तो तर करोडपती आहे. पण मी असं केलं नाही. माझं खरं लग्न केवळ आदिल दुर्रानीसोबत झाले आहे. निकाह झाला आणि रजिस्टर्ड मॅरेज झाले. मी आता पोटगीचा नाही तर त्याला जामीन मिळू नये याचा विचार करत आहे. ' स्वत:वर होत असलेल्या आरोपांवर राखी म्हणाली, 'मला लोकांना सांगायचे आहे, माझ्यावर डाग लावणं बंद करा. आधीच माझ्या पतीने अनेक डाग लावले आहेत.'
दरम्यान राखी सावंतच्या वकिलांनी आदिलच्या जामीनाला आव्हान दिले आहे. आदिलला जामीन मिळू नये म्हणून राखी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज दोघांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.