रमा राघव: पौरोहित्याच्या पात्रता परीक्षेला रमा कशी जाणार सामोरी?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 06:52 PM2024-02-23T18:52:43+5:302024-02-23T18:55:43+5:30
Rama raghav: दिग्विजयने रमाला पौरोहित्यासाठी पात्रता सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे आणि त्याकरता परीक्षा घेतली जाणार आहे.
छोट्या पडद्यावर सध्या रमा राघव ही मालिका चांगलीच गाजत आहे. अल्पावधीत या मालिकेने लोकप्रियता मिळवली असून रमा आणि राघव यांची जोडी चाहत्यांना विशेष भावली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक संकटाला रमा आणि राघव एकत्र मिळून तोंड देत असल्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे. यामध्येच आता रमाने पौरोहित्याचा वसा घेतल्यामुळे घरामध्ये आणि समाजामध्ये त्याचे मोठे पडसाद उमटले आहेत. परंतु, या सगळ्यात राघव, सासरे गजानन आणि आजीसासू तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत. तर, सासू शालिनी दोलायमान अवस्थेत आहे.
रमाचं आणि राघवचा संसार मोडावा आणि रमा पुन्हा माहेरी यावी अशी तिच्या सख्या आईची लावण्याची इच्छा आहे. त्यामुळे ती शक्य होईल तितकं रमा-राघवला त्रास देत आहे. यामध्येच तिने आता गजानन गुरुजींचा जुना शिष्य आणि आताचा शत्रू दिग्विजय याच्या सोबत तिने हातमिळवणी केली आहे. गजानन गुरुजींचा पौरोहित्याचा वसा देण्याचा निर्णय चुकीचा ठरवून त्याला आणि लावण्याला आणि त्यांचा स्वार्थ साधायचा आहे. त्यासाठी दिग्विजयने रमाला पौरोहित्यासाठी पात्रता सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे आणि त्याकरता परीक्षा घेतली जाणार आहे.
दरम्यान, या पात्रता परीक्षेला रमा कशी सामोरी जाईल? ही परीक्षा नेमकी कशी असेल, किती कठीण असेल, रमा ती उत्तीर्ण होईल का ? रमाने सासरच्या कुटुंबाची परंपरा पुढे नेण्याचा घेतलेला निर्णय ती कसा सार्थ ठरवणार? हे प्रेक्षकांना आता मालिका पाहिल्यावरच कळणार आहे.