या अभिनेत्याला साक्षात भगवंतानेच दिले भूमिका स्वीकारण्याचे संकेत... वाचा, असे काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 11:12 AM2020-05-12T11:12:40+5:302020-05-12T11:14:47+5:30
सर्वदमन यांना पाहताच रामानंद सागर यांनी लगेच त्यांना कृष्णाची भूमिका देऊ केली होती. पण सर्वदमन मात्र यासाठी तयार नव्हते...
लॉकडाऊनमुळे देशातील अनेक उद्योगांप्रमाणे मनोरंजन उद्योगही ठप्प आहे. ना शूटींग, ना नवे रिलीज. अशात अनेक वाहिन्यांनी आपल्या जुन्या लोकप्रिय मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा धडाका लावला आहे. लॉकडाऊनच्या काळात रामायण, महाभारत या पौराणिक मालिका सुरु झाल्यात. आता ‘श्रीकृष्ण’ ही मालिकाही आपल्या भेटीला आली आहे. आज याच मालिकेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रामानंद सागर यांनी रामायण ही मालिका बनवली. यानंतर लोकआग्रहास्तव ‘उत्तर रामायण’ही बनवले आणि यापश्चात कृष्णलीला छोट्या पडद्यावर आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हीच ती ‘श्रीकृष्ण’ मालिका़ श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी रामानंद सागर यांच्याकडे खरे तर अनेक उपलब्ध होते, पण रामानंद सागर यांना आपल्या मालिकेसाठी नवा श्रीकृष्ण हवा होता. अर्थात श्रीकृष्णाच्या मुख्य पात्रासाठी नवा चेहरा हवा होता. अखेर या मुख्य पात्रासाठी सर्वदमन बॅनर्जी यांचे नाव निश्चित झाले.
सर्वदमन यांना पाहताच रामानंद सागर यांनी लगेच त्यांना कृष्णाची भूमिका देऊ केली होती. पण सर्वदमन मात्र यासाठी तयार नव्हते. कारण त्यांना टीव्ही मालिकांमध्ये जराही रस नव्हता. दुसरे एक कारण म्हणजे सर्वदमन शिवभक्त होते आणि म्हणून कृष्णाची भूमिका साकारण्यास त्यांचे मन तयार नव्हते. रामानंद यांना त्यांनी हा पेच सांगितला़ यावर तू 10 दिवस आणखी विचार कर आणि मला कळव, असे रामानंद सागर यांनी सर्वदमन यांना सांगितले. सर्वदमन यांच्या मनातील पेच मात्र सुटत नव्हता. होकार द्यावा की नाही, हा गोंधळ आणखीच वाढला होता. शेवटी त्यांनी काय करावे तर देवाचा धावा केला. देवा, आता तूच मार्गदर्शन कर म्हणून ते अक्षरश: देवाला शरण गेले. अशात सात दिवस निघून गेले.
आठव्या दिवशी सर्वदमन ऑटोरिक्षातून दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांच्याकडे निघाले होते. वाटेत समुद्रकिनारा लागला आणि अचानक समुद्राच्या लाटांवर भगवान श्रीकृष्ण नृत्य करत असल्याचे सर्वदमन यांनी पाहिले. हा भास होतो की हे प्रत्यक्ष घडत होते, हेच सर्वदमन यांना कळेना. ते ऑटोतच भोवळ येऊन पडले. काही क्षणात शुद्धीवर आल्यावर त्यांनी तीच रिक्षा पकडून थेट रामानंद सागर यांचे घर गाठले आणि ‘श्रीकृष्ण’च्या भूमिकेसाठी आपला होकार कळवला.
हा देवाने दिलेला संकेत होता की, नियतीचा खेळ हे ठाऊक नाही. पण सर्वदमन यांनी साकारलेली ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. या भूमिकेने त्यांना अफाट लोकप्रियता मिळवून दिली.