मुलगा चालवणार वडिलांचा वारसा! रामानंद सागर यांचा लेक घेऊन येतोय पुन्हा 'रामायण'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 01:30 PM2024-02-26T13:30:31+5:302024-02-26T13:30:55+5:30
पुन्हा येणार 'रामायण'! रामानंद सागर यांचा लेक प्रेम सागर रामाच्या भूमिकेसाठी शोधत आहेत अभिनेता
८०-९०च्या दशकातील रामायण ही दूरदर्शनवरील मालिका प्रचंड गाजली होती. रामानंद सागर यांच्या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तर या मालिकेत राम, लक्ष्मण आणि सीतेच्या भूमिकेत असलेल्या अरुण गोविल, दीपिका चिखलीया यांना लोकप्रियता मिळवून दिली. आजही प्रेक्षकांच्या मनात त्यांची छबी कायम आहे. लॉकडाऊनमध्ये पुन्हा रामायणाचं प्रसारण दूरदर्शनवर करण्यात आलं होतं. तेव्हादेखील प्रेक्षकांकडून या मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेची लोकप्रियता लक्षात घेऊन रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी पुन्हा रामायण मालिका बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
'ईटाइम्स'शी बोलताना प्रेम सागर यांनी याचा खुलासा केला आहे. लवकरच या टीव्ही शोची घोषणा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. रामाच्या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्याच्या शोधात असल्याचंही प्रेम सागर म्हणाले. "आमची संपूर्ण टीम रामाच्या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्याच्या शोधात आहे. दिवसरात्र मेहनत घेत आहे. रामाच्या भूमिकेसाठी योग्य व्यक्ती भेटल्यानंतर या मालिकेची घोषणा आम्ही करू. मी एका नव्या व्यक्तिमत्वाच्या शोधात आहे. यापूर्वी कधीच श्रीरामाची भूमिका न साकारलेला कलाकार मला हवा आहे. मन माझ्यात मनात प्रभू श्रीरामाची जशी प्रतिकृती आहे. तसंच कोणी तरी मला या भूमिकेसाठी हवं आहे. राम एक विष्णूचा अवतार आहेत. मी देव आहे, असं त्यांनी कधीच सांगितलं नाही," असं ते म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितलं, "या मालिकेचं दिग्दर्शन मी करणार नाही. जुन्या रामायण मालिकेतील कोणीही या मालिकेत नसेल. पण, माझ्यासाठी हे एक मोठं आव्हान आहे. कारण, प्रेक्षक याची तुलना करणार आहेत. पण, याची मला चिंता नाही. मला वाटतं की हे माझं भाग्य आहे." रामानंद सागर यांच्या रामायणाप्रमाणेच प्रेम सागर यांची रामायण मालिकाही दूरदर्शनवरुनच प्रसारित केली जाणार आहे.