काय कट करून संपवले गेले रामायणातील ‘मेघनाद’चे फिल्मी करिअर? राजेश खन्नासारख्यांही वाटू लागले होते असुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 01:17 PM2020-04-17T13:17:47+5:302020-04-17T13:43:44+5:30
वाचा एक फ्लॅशबॅक स्टोरी
दूरदर्शनवरील रामायण ही मालिका सध्या जाम चर्चेत आहे. सोबत या मालिकेत वेगवेगळ्या भूमिका साकारणा-या कलाकारांचीही चर्चा रंगतेय. फिल्मी पडद्यावर मोठी छाप पाडणा-या अनेक कलाकारांनी रामानंद सागर यांच्या रामायणात भूमिका साकारल्या होत्या. मेघनादची भूमिका साकारणारा अभिनेता यापैकीच एक. या अभिनेत्याचे नाव काय तर विजय अरोरा. आज रामायण पुन्हा सुरु झालेय. पण ही मालिका पाहण्यासाठी विजय आपल्यामध्ये नाहीत. 2007 मध्येच त्यांचे निधन झाले.
विजय अरोरा यांनी रामायणात रावणाचा मुलगा इंद्रजीत अर्थात मेघनादची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्याआधी 70 व 80 च्या दशकात विजय अरोरा यांचा हिंदी फिल्म इंडस्ट्रीत चांगलाच बोलबाला होता. इतका की, सुपरस्टार राजेश खन्ना सारख्या अनेकांना त्यांच्यामुळे असुरक्षितता जाणवू लागली होती.
1972 साली ‘जरूरत’ या चित्रपटातून विजय यांनी डेब्यू केला होता. यात रिना रॉय त्यांची हिरोईन होती. रिनाचाही हा पहिला सिनेमा होता. यानंतर त्याकाळातील आघाडीची नायिका आशा पारेखसोबत विजय झकळले. राखी व हथकडी या सिनेमात त्यांनी काम केले. पण त्यांना खरी ओळख दिली ती 1973 साली प्रदर्शित ‘यादों की बारात’ या सिनेमाने.
या सिनेमात विजय अरोरा व जीनत अमान यांची जोडी जमली आणि विजय अरोरा एका रात्रीत स्टार झाले. त्यांच्या फिमेल फॅन्सची संख्या प्रचंड वाढली.
खरे तर 70 च्या दशकात राजेश खन्ना फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार होता. पण अचानक ‘यादों की बारात’नंतर विजय अरोरांची तुलना राजेश खन्नासोबत केली जाऊ लागली. विजय यांची लोकप्रियता वाढताना बघून खुद्द राजेश खन्ना यांनाही असुरक्षितता जाणवू लागली होती. असे म्हणतात की, यानंतर विजय अरोरा यांना काम मिळू नये म्हणून अगदी पद्धतशीरपणे कट रचला गेला आणि हळूहळू विजय अरोरा फिल्म इंडस्ट्रीतून बाद झाले.
रामानंद सागर यांनी रामायणात भूमिका साकारण्याची संधी विजय यांना दिली. यावेळी विजय यांचे वय 43 वर्षे होते. त्यांची ही भूमिका त्यावेळी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली. त्यानंतर त्यांना पुन्हा चित्रपटाच्या आॅफर येऊ लागल्या. 2007 साली त्यांचा कर्करोगाने मृत्यू झाला.