छोट्या पडद्यावर दिवाळीचा जल्लोष, या मालिकांमध्ये पाहायला मिळणार दिवाळीचे जंगी सेलिब्रेशन !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 09:00 AM2021-11-04T09:00:00+5:302021-11-04T09:00:00+5:30
'रंग माझा वेगळा' मालिकेत इनामदार कुटुंब दिवाळी साजरी करत असलं तरी दीपा आणि कार्तिकी या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणार का याची उत्सुकता आहे.
दिवाळी म्हणजे सण दिव्यांचा... सण प्रकाशाचा... सण उत्साहाचा आणि सण जल्लोषाचा... सोबतीला फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाईचा गोडवा... वर्षातून एकदा येणाऱ्या या दिव्यांच्या सणाच्या काळात वातावरण आल्हाददायक झाल्याचं पाहायला मिळतं. सा-यांच्या मनात नवचैतन्य संचारलेलं असतं. दिवाळीचा हाच उत्साह आणि जल्लोष कॅश करण्याचा प्रयत्न छोट्या पडद्यावर सुरु झालाय.
आनंदाचा उत्साहाचा आणि आपापसातले हेवेदावे विसरायला लावणारा सण म्हणजे दिवाळी. कितीही संकट आली तरी आतापर्यंत मोरे कुटुंबातल्या भावंडांमध्ये कधी दुरावा आला नाही. पण काही गैरसमजांमुळे पहिल्यांदाच पश्या आणि वैभवमधले वाद टोकाला गेलेत. पश्या सध्या तुरुंगात आहे. त्यामुळे मोरे कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार की नाही असं वाटत असतानाच मामीने पश्याची निर्दोष सुटका करण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे मोरे कुटुंबासाठी आणि खास करुन अंजी पश्यासाठी यंदाची दिवाळी महत्त्वाची ठरणार आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत सध्या शिर्केपाटील कुटुंबासमोर शालिनी नावाचं मोठं आव्हान आहे. शालिनीने शिर्केपाटटलांच्या प्रॉपर्टीवर हक्क दाखवत त्यांना घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. प्रॉपर्टी हवी असेल तर माझ्यासोबतचा कबड्डीचा सामना जिंकावा लागेल अशी अट तिने समोर ठेवली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण कुटुंब कबड्डीचा सामना जिंकण्यासाठी दिवस-रात्र सराव करत आहेत. शिर्केपाटील कुटुंबात दरवर्षी मोठ्या उत्साहात दिवाळाची सण साजरा होतो. यंदा मात्र साधेपणाने दिवाळी साजरी होईल. शेवटी आनंद आणि आपल्या माणसांची साथ मोलाची. खरं सुख यालाच तर म्हणतात. त्यामुळे बडेजाव नसला तरी शिर्केपाटील कुटुंबाच्या आनंदात तसुभरही कमी झालेली नाही.
'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेच्या नावातच आनंद आणि उत्साह आहे. कानेटकर कुटुंबातही दिवाळीचा सण पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा होणार आहे. खरतर सध्या असं एकत्र कुटुंब खूपच अभावाने पाहायला मिळतं. पण एकत्र कुटुंबासारखा दुसरा आनंद नाही. सुख-दु:खात आपण एकटे नाही, तर आपल्या मागे आपलं कुटुंब भक्कमपणे उभं आहे हा विचारच नवी उर्जा देतो. सध्या हे कानिटकर कुटुंब प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग झालं आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला फराळ, अभ्यंगस्नान, लक्ष्मीपुजन, पाडवा आणि भाऊबिज हे सगळंच अगदी साग्रसंगीत पार पडणार आहे.
'रंग माझा वेगळा' मालिकेत इनामदार कुटुंब दिवाळी साजरी करत असलं तरी दीपा आणि कार्तिकी या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणार का याची उत्सुकता आहे. खरतर कार्तिकी ही दीपा आणि कार्तिकची मुलगी असूनही तिला या आनंदापासून इतकी वर्ष दुर रहावं लागलं. आता तरी कार्तिकीला तिचा हक्क मिळणार का हे पहाणं उत्सुकतेचं असेल. का सहकुटुंब सहपरिवार, रंग माझा वेगळा, सुख म्हणजे नक्की काय असतं आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेचे दिवाळी विशेष भाग रसिकांना पाहाता येणार आहेत.