खलनायक रंजीत यांचे हे आहे खरे नाव, या अभिनेत्याच्या सांगण्यावरून बदलले नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 03:01 PM2019-04-22T15:01:42+5:302019-04-22T15:03:59+5:30
अभिनेता रंजीत यांचे खरे नाव वेगळे असून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यासाठी नाव बदलले असल्याचे गुपित उलगडले.
द कपिल शर्मा शो मध्ये प्रत्येक आठवड्यात विविध क्षेत्रातील काही मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. या आठवड्यात या कार्यक्रमात बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध खलनायकांनी हजेरी लावली होती. रंजीत, गुलशन ग्रोव्हर आणि किरण कुमार यांनी या कार्यक्रमाच्या टीमसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि कपिल शर्माच्या टीमसोबत खूपच धमाल मस्ती केली.
कपिल शर्मासोबत गप्पा मारताना या खलनायकांनी आपल्या आयुष्यातील अनेक सिक्रेट्सविषयी सांगितले. अभिनेता रंजीत यांचे खरे नाव वेगळे असून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यासाठी नाव बदलले असल्याचे गुपित उलगडले. तसेच रंजीत हे नाव त्यांना बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध नायकाने दिले असल्याचे देखील त्यांनी यावेळी सगळ्यांसोबत शेअर केले. याविषयी रंजीत यांनी सांगितले की, माझे खरे नाव गोपाळ आहे. सुनील दत्त यांचा माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव आहे. माझे नाव हे खूपच कॉमन असल्याचे त्यांना वाटत असल्याने त्यांनी माझे नाव रंजीत ठेवण्याविषयी सुचवले. माझे आणि त्यांचे संबंध खूपच चांगले होते. माझ्या आयुष्यातील अतिशय जवळच्या व्यक्तींपैकी ते एक होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी चित्रपटात खलनायकाच्या भूमिका साकारल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात मी खूपच वेगळा आहे. अनेक चित्रपटात मला दारू पिताना दाखवण्यात आले आहे. पण खऱ्या आयुष्यात मी दारू, सिगारेटला कधी स्पर्श देखील केला नाही. एवढेच नव्हे तर मी शुद्ध शाकाहारी आहे.
या कार्यक्रमात अर्चना पुरण सिंगने गुलशन ग्रोव्हरचे प्रचंड कौतुक केले. गुलशन कधीही कोणाला मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतो असे अर्चनाने सांगितले. ती म्हणाली, मी आणि गुलशन एका अमेरिकन कार्यक्रमाचे चित्रीकरण करत होतो. त्यावेळेची एक घटना मी कधीच विसरू शकत नाही. त्या चित्रीकरणाला माझे पती परमित सेठी माझ्यासोबत आले होते. तिथे गेल्यावर आम्हाला कळले की, तेथील हॉटेलमध्ये केवळ एकच रूम शिल्लक आहे. आमच्याकडे काहीही पर्याय नसल्याने आम्ही तिघांनी एकाच रूममध्ये राहाण्याचे ठरवले. मी आणि परमित रूममध्ये पोहोचलो तर आम्ही पाहिले की, गुलशन खाली चटई टाकून झोपला होता. मला आणि परमितला काहीही त्रास होऊ नये म्हणून गुलशनने खाली झोपणे पसंत केले होते.