‘कुल्फीकुमार बाजेवाला’साठी विशाल आदित्य सिंहने रचले एक रॅपगीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:23 PM2018-07-10T12:23:07+5:302018-07-10T12:24:34+5:30
रॅपर कसे गातात, त्यांची देहबोली कशाप्रकारे असते याचे विशाल आदित्य सिंह प्रशिक्षण घेत असून या मालिकेत तो स्वत:च आपले रॅपगीत रचणार आहे.
‘कुल्फीकुमार बाजेवाला’ ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडत आहेत. या मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. या मालिकेच्या कथानकाला आता काही वळणं मिळणार आहेत. या मालिकेत आता एका नव्या कलाकाराची एंट्री होणार असून हा कलाकार छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध कलाकार आहे. याच्या एंट्रीनंतर मालिका प्रेक्षकांना अधिक आवडेल अशी मालिकेच्या टीमला खात्री आहे.
‘चंद्रकांता’ या भव्य मालिकेत राजपुत्र वीरेन्द्र (वीर) प्रतापसिंहच्या भूमिकेमुळे विशाल आदित्य सिंहला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेनंतर तो कोणत्या मालिकेत झळकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. तो आता ‘स्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत तेवर नावाच्या एका ‘रॅप’गायकाच्या भूमिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.
विशालने आतापर्यंत पारंपरिक भारतीय व्यक्तिरेखा साकारल्या असून आता तो प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तेवरच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना आपली एक वेगळीच बाजू दाखविण्यासाठी तो उत्सुक आहे. रॅपर कसे गातात, त्यांची देहबोली कशाप्रकारे असते याचे तो प्रशिक्षण घेत असून या मालिकेत तो स्वत:च आपले रॅपगीत रचणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या मालिकेच्या चित्रीकरणाला तो लवकरच सुरुवात करणार आहे. त्याच्या या भूमिकेविषयी विशाल सांगते, “अशी वैशिष्ट्यपूर्ण भूमिका माझ्या वाट्याला येण्याची मी वाटच बघत होतो. तेवर हा लहरी आणि विक्षिप्त असून तो स्वत:च आपली रॅप गीतं रचतो, ही गोष्ट मला फार आवडली. त्याच्या या भूमिकेमुळे मला माझ्यातील गायनाचा आणि कवितालेखनाचा गुण विकसित करण्याची संधी मिळाली. ही गोष्ट आव्हानात्मक असली, तरी मला ती फार आवडली आहे.”
विशालला एका अगदी नव्या प्रकारच्या भूमिकेत पाहणे प्रेक्षकांसाठीही आनंददायक ठरेल. त्याची ही भूमिका आजवरच्या त्याच्या सगळ्या भूमिकांप्रमाणे प्रेक्षकांना आवडेल अशी त्याला खात्री आहे.