रॅपर बादशाह 'इंडियाज गॉट टॅलेंट १०'मध्ये पुन्हा एकदा दिसणार परीक्षकाच्या रूपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 17:22 IST2023-07-12T17:22:31+5:302023-07-12T17:22:56+5:30
India's Got Talent 10 : 'इंडियाज गॉट टॅलेंट'चा दहावा सीझन लवकरच सुरू होत आहे.

रॅपर बादशाह 'इंडियाज गॉट टॅलेंट १०'मध्ये पुन्हा एकदा दिसणार परीक्षकाच्या रूपात
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील टॅलेंट रिअॅलिटी शो इंडियाज गॉट टॅलेंटचा दहावा सीझन लवकरच सुरू होत आहे. या कार्यक्रमात अशा सामान्य माणसांवर प्रकाशझोत असतो, ज्यांच्यात या प्रतिष्ठित मंचावर आपले अपूर्व कौशल्य दाखवून असामान्य बनण्याची क्षमता असते. या शोमध्ये डान्सर, गायक, जादूगार, रॅपर, बीटबॉक्सर, स्टंट करणारे वगैरे विविध कला प्रदर्शित करणारे कलाकार प्रेक्षकांना अवाक करतील. या सत्रात देशातील आजवर प्रकाशझोतात न आलेले टॅलेंट्स लोकांसमोर येईल. रॅप आयकॉन बादशाह पुन्हा एकदा या सत्रात आपली परीक्षकाची भूमिका बजावणार आहे. रॅपिंगचे कसब, संगीताची समज आणि जबरदस्त ऊर्जा असलेला बादशाह प्रेक्षकांना अचंबित करणाऱ्या लक्षवेधी प्रतिभेचा शोध घेताना दिसेल.
पुन्हा ही भूमिका बजावत असल्याचा आनंद व्यक्त करताना बादशाह म्हणतो की, इंडियाज गॉट टॅलेंटचे मागील सत्र पहिले असे सत्र होते, ज्यात मी परीक्षक म्हणून काम केले होते. तो माझ्या आयुष्यातील एक अत्यंत सुंदर अनुभव होता. या अनुपम प्रतिभावंतांच्या अस्सल भावनांचे आणि त्यांच्या संवेदनशिलतेचे प्रत्यक्ष दर्शन मला या मंचावर झाले आणि आपल्या देशात कसे कलासंपन्न कलाकार आहेत, हे देखील मला अनुभवता आले. त्यांच्या कलेने माझ्यासहित लक्षावधी लोकांच्या अंतःकरणाला कसा स्पर्श केला, हे अनुभवणे स्वप्नवत होते. ते पाहून माझे मन अभिमानाने भरून गेले.
तो पुढे म्हणाला की, आता इंडियाज गॉट टॅलेंटच्या आणखी एका नवीन सत्रात पुन्हा परीक्षक म्हणून दाखल होताना मला खूप आनंद होत आहे. इंडियाज गॉट टॅलेंटचे हे दहावे सत्र असल्याने ते विशेष आहे आणि या सत्रात मागील सत्रात सेट केलेले मापदंड ओलांडून पुढे जाणारे अद्वितीय प्रतिभावान कलाकार बघण्यास मी उत्सुक आहे. इंडियाज गॉट टॅलेंटचा दहावा सीझन २९ जुलैपासून रात्री ९:३० वाजता आणि दर शनिवारी आणि रविवारी रात्री ९:३० वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळेल.