मध्येच ब्रेक लागलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ तिसऱ्या मालिकेची वाटचाल सुरु होणार, लवकरच शूटिंगला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 02:25 PM2021-06-29T14:25:56+5:302021-06-29T14:26:59+5:30
कोकणातल्या माणसांच्या स्वभावांची सांगड घालून ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका आल्यानं प्रत्येक कॅरेक्टर लोकांना आपल्या घरातील वाटलं. हे या मालिकेचं श्रेय आहे.
छोट्या पडद्यावरील 'रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेने आपल्या तीन भागांच्या आजवरच्या प्रवासात बऱ्याच कलाकारांना प्रकाशझोतात आणण्याचं काम केलं आहे. यासोबतच या मालिकेनं अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रल्हाद कुडतरकरचीही नवी ओळख निर्माण केली आहे. लॅाकडाऊनमुळं शूट बंद असल्यानं ‘रात्रीस खेळ चाले’ सध्या प्रसारीत होत नसली तरी, लवकरच शूट सुरू होऊन पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या साक्षीनं पुन्हा या मालिकेची वाटचाल सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
'रात्रीस खेळ चाले’चा तिसरा भाग येण्याबाबत प्रल्हाद म्हणाला की, "पहिला भाग झाल्यावर दुसरा भाग डोक्यात नव्हता. झी मराठीचे बिझनेस हेड निलेश मयेकर यांनी दुसऱ्या भागाची संकल्पना सुचवली. यात प्रिक्वेलला वाव मिळाला. दुसरा भाग संपतानाही तिसऱ्या भागाबाबत विचार केला नव्हता, पण एकंदरच प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद पाहता तिसरा भाग आपोआपच आला. कारण तेव्हा प्रेक्षकांनी मालिका उचलून धरली होती. दुसरा भाग संपता संपताच तिसऱ्या भागाबाबत विचारणा सुरू झाली होती. या आधीही मालवणी मालिका आल्या, पण ‘रात्रीस खेळ चाले’ कौटुंबिक गोष्ट घेऊन आली. कोकणात अशा खूप गजाली असतात. आपण त्या कुठे ना कुठे ऐकलेल्या असतात.
कोकणातल्या माणसांच्या स्वभावांची सांगड घालून ही मालिका आल्यानं प्रत्येक कॅरेक्टर लोकांना आपल्या घरातील वाटलं. हे या मालिकेचं श्रेय आहे. या मालिकेत नायक-नायिका नाहीत. कोकणातल्या बऱ्याच गावांमध्ये पांडू, माई आणि सुसल्यासारखी कॅरेक्टर्स असतात. ही सर्व कॅरेक्टर्स लोकांसोबत कुठेतरी कनेक्ट झाल्यामुळेच आपलेपणा वाटला. मालिकेबाबत खूप पूर्वी वाद झाला होता, पण तीन भाग आल्यानंतर आता वाद नव्हे, तर आशीर्वाद आहेत."
मालिकेच्या नवीन भागांच्या प्रसारणाबद्दल बोलताना प्रल्हाद म्हणाला, "लवकरच मालिकेचं शूटिंग सुरु होईल. त्यानंतर लगेचच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
कोकणात सध्या प्रचंड पाऊस सुरु असल्यामुळे पावसाचा व्यत्यय आहेच; पण रात्रीस खेळ चाले हि मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याची इच्छा आहे. तिसऱ्या पर्वातील गोष्ट काही वर्षांनंतरची आहे. त्यामुळं लोकांना बरेच प्रश्न पडले असतील त्यांची उत्तरं पुढील भागांमध्ये मिळणार आहेत. कथानक अधिकाधीक गूढ होत जाईल. ज्या अण्णा शेवंताला लोकांनी डोक्यावर घेतलं ते आता भूतांमध्ये सामील झाले आहेत. ते नेमकं काय करणार आहेत? वाड्याची वाटणी होईल का? वाडा विकला जाईल का? या प्रश्नांची उत्तर रंजकपणे देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत."