या कारणाने अरमान मलिकने इंडियन आयडॉल 10 मधील या स्पर्धकाचे केले कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 06:04 PM2018-07-20T18:04:37+5:302018-07-21T08:30:00+5:30
नेहा कक्कड, अन्नू मलिक आणि विशाल दादलानी हे इंडियन आयडॉल 10 या सिझनचे परीक्षक असून ते स्पर्धकांची काटेकोर पारख करत आहेत. त्यामुळे हे स्पर्धक आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करत आहेत.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉलच्या दहाव्या सत्राने केवळ सामान्य प्रेक्षकांचीच नाही, तर संगीत क्षेत्रातील मान्यवरांची मने देखील जिंकली आहेत. गायन प्रतिभा ठासून भरलेल्या या कार्यक्रमाने देशभरातील लोकांचे लक्ष वेधले आहे. या कार्यक्रमाच्या आजवरच्या अनेक सिझनमधील स्पर्धक आज बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावत आहेत. या सिझनमधील स्पर्धकांचे आवाज देखील खूपच छान आहेत. सगळेच स्पर्धक एकाहून एक सरस परफॉर्मन्स कार्यक्रमात सादर करत आहेत. नेहा कक्कड, अन्नू मलिक आणि विशाल दादलानी हे या सिझनचे परीक्षक असून ते स्पर्धकांची काटेकोर पारख करत आहेत. त्यामुळे हे स्पर्धक आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करत आहेत.
सलमान अली या स्पर्धकाने ऑडिशन फेरीत ‘माय नेम इज खान’ चित्रपटातील सजदा तेरा सजदा हे गीत म्हटले. सलमानने ते गीत इतके सुरेख म्हटले की, प्रसिद्ध गायक अरमान मलिकने स्वतः सोशल नेटवर्किंग साइटवर त्याचे कौतुक केले. अरमानने लिहिले, “दोस्ता, तुझ्यावर देवाचा वरदहस्त राहो! #सजदा खूप आवडले!” या नवोदित गायकासाठी ही टिप्पणी हे खूप मोठे कौतुक होते. याविषयी अरमान मलिक सांगतो, “मी सोशल नेटवर्किंग साइटवर सलमान अलीचा प्रोमो पाहिला आणि त्याचा गोड आवाज ऐकून मी मंत्रमुग्ध झालो. त्याच्या आवाजात अद्भुत ताकद आहे आणि तो जणू अंतिम फेरीत गात असल्यासारखा गात होता. मला हा कार्यक्रम आवडतो आणि नवीन प्रतिभावंत देखील आवडतात, ज्यांचा या मंचावरून प्रचार होत आहे. मी अशा एका रिअॅलिटी शो मध्ये गायलेलो आहे आणि तेथे तुम्हाला प्रोत्साहन मिळणे किती महत्त्वाचे आहे, याची मला कल्पना आहे. मी इंडियन आयडॉल 10 नियमितपणे ऑनलाइन पाहतो. येत्या भागांमध्ये सर्वोत्तम 12 स्पर्धक कोण येणार त्याची मी आतुरतेने वाट पाहतो आहे.”
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या इतर सिझन प्रमाणे हा सिझन देखील प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करेल अशी सगळ्यांना खात्री आहे.