या कारणामुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची दया मालिकेपासून दूर, या व्यक्तीला ती नकोय…...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 01:06 PM2018-10-29T13:06:18+5:302018-10-29T13:07:43+5:30
गेल्या वर्षाभरापासून रसिकांची लाडकी दया ही 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून गायब आहे. दया फेम अभिनेत्री दिशा वाकाणी कधी परतणार असा प्रश्न रसिकांना पडला आहे.
छोट्या पडद्यावरील रसिकांची आवडती मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. गेल्या अनेक वर्षापासून ही मालिका आणि मालिकेतल्या व्यक्तीरेखा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. यातील प्रत्येक पात्र विशेष आहे, मात्र रसिकांची आवडती जोडी ठरली ती जेठालाल आणि दया. या दोघांच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. त्यामुळे दोघांची एकत्र धमाल रसिकांना पाहायची जणू काही सवयच झाली. मात्र गेल्या वर्षाभरापासून रसिकांची लाडकी दया ही 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून गायब आहे. दया फेम अभिनेत्री दिशा वाकाणी कधी परतणार असा प्रश्न रसिकांना पडला आहे.
दिशा 2008 पासून सतत 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये काम करत आहे. तिने सप्टेंबर 2017 मध्ये मॅटरनिटी लिव्ह घेतली होती आणि यानंतर 5 महिन्यांनी ती मालिकेत येईल असे बोलले जात होते. 2017 मध्ये दिशाने मुलीला जन्म दिला. त्यानंतर तरी ती मालिकेत कमबॅक करेल असं बोललं जात होतं. नवरात्रीमध्ये मालिकेत कमबॅक करणार असे वृत्त काही दिवसांपुर्वी आले होते. पण असे झाले नाही. आतापर्यंत दिशा प्रेग्नेंसी आणि बाळामुळे शोपासून दूर होती. पण आता तिला आई होऊन 11 महिने झाले आहे. तिचे रिल लाइफपासून दूर राहण्याचे कारण तिचे पती असल्याचे बोलले जात आहे. दिशाचा पती मयूरच्या हस्तक्षेपामुळे ती मालिकेत कमबॅक करु शकत नसल्याच्या चर्चा आहेत.
सीए असलेल्या मयूरला दिशाने काम करू नये असं वाटत असल्याचं सांगितलं जातंय. हे कौटुंबिक प्रकरण असल्याचे मालिकेच्या निर्मात्यांनी म्हटलंय. दिशाने काय करावं,तिच्या मनात काय सुरू आहे, घरात काय चाललंय हे आम्हाला माहित नसल्याचेही निर्मात्यांनी सांगितले आहे. मात्र लवकरात लवकर तिच्याशी संपर्क साधू आणि तिच्याशी बोलू. कारण ती लवकरात लवकर दया म्हणून छोट्या पडद्यावर यावी अशी रसिकांची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलंय.