या कारणामुळे कवी कुमार आझाद यांच्या अंत्ययात्रेला चिडली मुनमुन दत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:46 AM2018-07-13T11:46:23+5:302018-07-13T11:49:43+5:30
कवी कुमार आझाद यांच्या अंत्ययात्रेला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. या मालिकेच्या टीमला यावेळी एक खूपच वाईट अनुभव आला.
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांनी 9 जुलैला मीरा रोड मधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. कवी कुमार आझाद यांनी छोट्या पडद्याप्रमाणे मोठ्या पडद्यावर देखील काम केले होते. मेला या चित्रपटात आमिर खान सोबत ते झळकले होते. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत निर्मल सोनी डॉ. हाथची भूमिका साकारत होते. पण त्यांनी ही मालिका सोडल्यामुळे २००८ मध्ये कवी कुमार आझाद यांना या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. ते एक चांगले कलाकार असण्यासोबतच एक चांगले कवी होते. त्यांच्या अंत्ययात्रेला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या टीमला यावेळी एक खूपच वाईट अनुभव आला. कवी कुमार आझाद यांच्या निधनामुळे सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसला होता. कोणाशीही बोलण्याच्या देखील मनःस्थितीत या मालिकेतील कलाकार नव्हते. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या केवळ टीमला पाहाण्यासाठी लोकांनी कवी कुमार आझाद यांच्या अंत्ययात्रेला गर्दी केली होती. लोक कलाकारांचे फोटो काढत होते. तसेच सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होते. या सगळ्यामुळे या मालिकेत बबिताची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता प्रचंड चिडली आहे. तिनेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगद्वारे ही गोष्ट सांगितली आहे.
मुनमुन दत्ताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लिहिले आहे की, आम्ही हाथी भाई यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी लोक आमच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आमच्या चेहऱ्यासमोर मोबाईल ठेवत होते. आमचे फोटो काढत होते, व्हिडिओ काढत होते. अशा वेळी लोकांनी असे वागणे खूपच चुकीचे आहे. अशा वेळात लोक निधन पावलेल्या सेलिब्रेटीला शेवटेचे अभिवादन करायला नव्हे तर तिथे येणाऱ्या इतर सेलिब्रेटींचे फोटो काढून ते सोशल मीडियावर अपलोड करायला येतात असेच मला वाटते. मी दोन लोकांवर अक्षरशः ओरडले. काही लोक समोरच्या बिल्डिंगमधून आमचे फोटो, व्हिडिओ काढत होते. ते पाहून तिथे कोणाताही तमाशा व्हायच्याआधी मी तिथून निघाले.