या कारणामुळे पपिया सेनगुप्ता करत नाहीये लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:07 PM2018-07-10T13:07:01+5:302018-07-10T13:08:01+5:30
कयामत की रात या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली पपिया सेनगुप्ता अद्याप अविवाहित आहे. तिने लग्न केले नाही याचा तिला आनंदच आहे. तिने लग्न न करण्यामागे एक खास कारण आहे.
‘स्टार प्लस’वरील ‘कयामत की रात’ या नव्या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असून सुरुवातीपासूनच तिला प्रचंड प्रेक्षकवर्ग लाभला आहे. या मालिकेत अनेक नामवंत कलाकार भूमिका साकारत आहेत. या मालिकेत पपिया सेनगुप्ता आणि अपरा मेहता यांच्यासारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. गेली 25 वर्षं एका शापामुळे मृत्यूला हुलकावणी देणाऱ्या एका दुष्ट तांत्रिकाच्या छळामुळे त्रस्त झालेल्या दोन कुटुंबांची कथा यात सादर करण्यात आली आहे.
मालिका अधिक दर्जेदार करण्यासाठी त्यातील प्रत्येक कलाकार आणि कर्मचारी प्रचंड मेहनत घेत आहेत. या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली पपिया सेनगुप्ता अद्याप अविवाहित आहे. तिने लग्न केले नाही याचा तिला आनंदच आहे. याविषयी ती सांगते, मला इतक्यात कोणत्याही नातेबंधनात अडकायचे नाहीये. माझे स्वातंत्र्य मला खूपच प्रिय आहे. माझे एका व्यक्तिवर प्रेम आहे. परंतु माझे सर्वाधिक प्रेम स्वत:वर असल्याने त्याच्याशिवायही जीवन जगण्यास माझी हरकत नाहीये.
आता विवाह करण्यात कोणती अडचण आहे, असे तिला विचारल्यावर पपिया सांगते, “विवाह करून सुखी जीवन जगणारी जोडपी अजून तरी माझ्या पाहण्यात आलेली नाहीत. ज्यांनी विवाह केला आहे, ते मला त्या विरोधात सल्ला देत असतात. आता माझ्या मित्र-मैत्रिणींनीही मला भावी जोडीदाराची नावं सुचविणं बंद केलं आहे. आपल्या देशात तरुण मुली आता एकदम स्वतंत्र बनल्या असून त्यांना केवळ पत्नीची भूमिका साकारण्यात स्वारस्य वाटत नाही. दुसरीकडे, लग्नानंतर पुरुष अजूनही आपले वर्चस्व गाजवत असताना दिसत आहेत. बऱ्याच वर्षांपूर्वी मी एका परदेशी माणसाच्या प्रेमात पडले होते. एक व्यक्ती म्हणून मी कशी आहे, हे जाणून घेण्यापेक्षा माझ्या जीवनात पूर्वी काय घडलं होतं आणि मी कोणाला भेटले, याची त्याला अधिक काळजी होती. लग्नाच्या बेडीत अडकण्याचा माझा तरी विचार नाही. मी फारच स्वतंत्र बाण्याची स्त्री आहे. माझा जीवनसाथी बनण्याची खरोखरच इच्छा असलेला कोणी मला भेटला, तर मी नक्की त्याच्याशी लग्न करीन.”