या कारणामुळे थांबवावे लागले इंडियन आयडॉल 10चे चित्रीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:42 AM2018-07-04T11:42:38+5:302018-07-04T11:44:12+5:30
इंडियन आयडॉल 10चे चित्रीकरण काही मिनिटांसाठी थांबवण्यात आले होते. हे चित्रीकरण थांबण्यामागे काय कारण होते हे ऐकल्यावर तुम्हाला देखील नक्कीच हसू कोसळेल.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनच्या इंडियन आयडॉल मध्ये एकापेक्षा एक प्रतिभावान स्पर्धक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या सत्रासाठी परीक्षकाची जबाबदारी सुप्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक विशाल दादलानी, गायिका नेहा कक्कड आणि वरिष्ठ गायक व संगीत दिग्दर्शक अनू मलिक यांनी स्वीकारली आहे तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष पॉल करत आहे. सेटवरील वातावरण प्रसन्न आणि हलकेफुलके ठेवण्यासाठी हे परीक्षक कोणतीही कसर शिल्लक राहू देत नाहीत.
ऑडिशनच्या एका चित्रीकरणादरम्यान आपल्या शायरीसाठी प्रसिद्ध असलेल्या अन्नू मलिकने एक विनोद केला, ज्यामुळे सेटवरील सर्व लोकांची हसून पुरेवाट झाली. याची सुरुवात अन्नू मलिकने प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘ओ ओ जाने जाना’ विनोदी पद्धतीने म्हणण्यास सुरुवात केली त्यापासून झाली. ते ऐकून एरवी गंभीर असणाऱ्या विशाल दादलानीला देखील हसू आवरेना. या गंभीर मुद्रेच्या परीक्षकाला इतके हसू आले की, तो खुर्चीतून खाली पडला. या सगळ्यामुळे चित्रीकरण दहा मिनिटांसाठी थांबवण्यात आले. क्रू सदस्यांना आधी लक्षातच आले नाही काय झाले ते... पण मग त्यांनी विशालला जमिनीवर गडबडा लोळताना आणि हसताना पाहिले. विशालचे हसून झाल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, त्याच्या कोपराच्या हाडाला थोडी दुखापत झाली आहे. या प्रसंगाबद्दल बोलताना अन्नू मलिक सांगतो, “एक स्पर्धक ऑडिशन देत होता आणि तो खूप वरच्या पट्टीत गात होता. त्यावर मी काही तरी बोललो आणि विशालला इतके हसू अनावर झाले की हसता हसता तो खुर्चीतून खाली पडला. यामुळे त्याला दुखापत देखील झाली.”
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला काहीच दिवस झाले असले तरी या कार्यक्रमाच्या परीक्षकांमध्ये खूपच छान गट्टी जमली आहे. याविषयी अन्नू सांगतो, “मी जेव्हा विशाल आणि नेहासोबत असतो, तेव्हा आमची मैत्री खूपच जुनी असल्याचे मला वाटते. आम्ही आता एक मोठे कुटुंबच बनलो आहोत. पहिल्या दिवसापासूनच आमची खूप चांगली मैत्री झाली आहे.”