लग्नाआधी सासूचं निधन, रेश्मा शिंदे म्हणाली- "अम्माला माहीत होतं मी अभिनेत्री आहे, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 14:42 IST2024-12-18T14:41:41+5:302024-12-18T14:42:11+5:30
अभिनेत्री असल्याचं तिच्या नवऱ्याला माहीत नव्हतं. पण, तिच्या सासूबाईंना ती या क्षेत्रात काम करत असल्याचं माहीत होतं, असं रेश्माने सांगितलं.

लग्नाआधी सासूचं निधन, रेश्मा शिंदे म्हणाली- "अम्माला माहीत होतं मी अभिनेत्री आहे, पण..."
'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. रेश्माने बॉयफ्रेंड पवनसोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. पवन साऊथ इंडियन आहे. त्यामुळेच महाराष्ट्रीयन आणि दाक्षिणात्य अशा दोन्ही पद्धतीने त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर रेश्माने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या सासू सासऱ्यांबद्दल भाष्य केलं.
रेश्मा अभिनेत्री असल्याचं तिच्या नवऱ्याला माहीत नव्हतं. पण, तिच्या सासूबाईंना ती या क्षेत्रात काम करत असल्याचं माहीत होतं, असं रेश्माने सांगितलं. खरं तर गेल्यावर्षीच रेश्मा आणि पवन लग्न करणार होते. पण, सासूबाईंचं निधन झाल्याने त्यांनी लग्न पुढे ढकललं. सासूबाईंबद्दल बोलताना रेश्मा भावुक झाली होती. रेश्मा म्हणाली, "अम्माला माहीत होतं की मी या क्षेत्रात काम करते. पण, त्यांचं गेल्याच वर्षी निधन झालं. गेल्यावर्षीच आम्ही लग्न करणार होतो. पण, मग आम्ही ते पुढे ढकललं".
सासऱ्यांविषयी रेश्मा म्हणाली, "अप्पा आहेत आणि त्यांना माझी मालिका बघायला मजा येते. त्यांना इंग्लिश आणि हिंदी कळतं. पण, मराठी शब्द हिंदीशी रिलेट करून ते थोडासा अंदाज बांधतात". "नवऱ्याशी कुठल्या भाषेत गप्पा मारतेस?" असं विचारल्यावर रेश्मा म्हणाली, "आम्ही हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलतो. त्याला खरं तर मराठी येतं. पण, मी थोडासा शिकण्याचा प्रयत्न करतेय".
रेश्माचा नवरा पवन आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. तो युकेला स्थायिक होता. मात्र रेश्माचं अभिनयातील करिअर तसंच तिने नव्याने सुरु केलेला ज्वेलरी व्यवसाय हे पाहून त्याने पुन्हा भारतात येण्याचा निर्णय घेतला. दोघांचं थाटात लग्न झालं. लग्नानंतर रेश्मा तिच्या बंगळुरु येथील सासरीही गेली होती. तिथे तिच्या सासरच्या मंडळींनी तिचं जंगी स्वागत केलं होतं. रेश्मा सध्या 'स्टार प्रवाह'वरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.