'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 10:15 AM2024-10-09T10:15:15+5:302024-10-09T10:16:04+5:30
सगळे 'भाऊ' हाक मारतात तेव्हा काय वाटतं? याही प्रश्नाचं उत्तर रितेशने दिलं आहे.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा (Bigg Boss Marathi Season 5) काही दिवसांपूर्वी शेवट झाला. हा सीझन रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) गाजवला. पहिल्यांदाच त्याने बिग बॉसचं होस्टिंग केलं. याआधी चारही सीझनमध्ये महेश मांजरेकरांनी दमदार होस्टिंग केलं होतं. तर यावेळी रितेशने 'भाऊचा धक्का' स्टाईलमध्ये शो होस्ट केला. रितेशचा 'भाऊचा धक्का'टीआरपीत नंबर वन ठरला. आता बिग बॉस मराठीच्या पुढच्या पर्वाचंही सूत्रसंचालन करणार का? याचं उत्तर रितेशने नुकतंच दिलं आहे.
बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले झाल्यावर रितेश देशमुखने विजेता सूरज चव्हाणसोबत फोटो शेअर केला. तसंच त्याचा संपूर्ण प्रवासही दाखवला. दोन आठवडे भाऊचा धक्का का झाला नाही याचंही कारण त्याने फिनालेमध्ये सांगितलं. नुकतंच त्याने 'मुंटा'ला मुलाखत दिली. सगळे प्रेमाने 'भाऊ' म्हणतात तेव्हा कसं वाटतं आणि बिग बॉसच्या पुढच्या पर्वात भाऊ दिसणार का? या प्रश्नावर रितेश म्हणाला, "माझे लहान भाऊ मला दादा म्हणतात तर मी माझ्या मोठ्या भावांना भैय्या म्हणतो. घरात कोणीच एकमेकांना भाऊ अशी हाक मारत नाही. मला पहिल्यांदा भाऊ हाक मारणारा सलमान खान आहे. आम्ही दोघंही मग एकमेकांना भाऊ म्हणतो. अख्खी दुनिया सलमानला भाई म्हणते पण मी त्याला भाऊ म्हणतो. आमचं नातंही भावासारखंच आहे. हे प्रेमळ नाव त्यांनीच मला दिलं आहे."
तो पुढे म्हणाला, "प्रेक्षकही आता मला भाऊ म्हणतात. याचा अर्थ मी त्यांना त्यांच्यातलाच वाटतो. एकमेकांचा आदर करणं हीच तर आपली संस्कृती आहे. त्यामुळे मला सगळे भाऊ म्हणतात हे ऐकून मला आनंदच होतो. तसंच यासोबत जबाबदारीही येते. पुढच्या बिग बॉसमध्ये दिसणार की नाही हा निर्णय तर चॅनलचाच असेल."