मद्यपान करून धिंगाणा घालणारी ती अभिनेत्री मी नव्हेच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 08:01 PM2019-04-02T20:01:49+5:302019-04-02T20:04:00+5:30
रुही सिंग २०११ फेमिना मिस इंडिया इस्टची उपविजेती असून तिने कॅलेंडर गर्ल्स या चित्रपटात देखील काम केले असल्याचे अनेक वृत्तवाहिन्यांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे. पण आता रुही सिंगने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून ती धिंगाणा घालणारी व्यक्ती मी नव्हतेच असे म्हटले आहे.
टीव्ही अभिनेत्री रुही सिंह हिने सोमवारी रात्री मद्यपान करून धिंगाणा घातल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. ही रुही सिंग २०११ फेमिना मिस इंडिया इस्टची उपविजेती असून तिने कॅलेंडर गर्ल्स या चित्रपटात देखील काम केले असल्याचे अनेक वृत्तवाहिन्यांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे. पण आता रुही सिंगने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून ती धिंगाणा घालणारी व्यक्ती मी नव्हतेच असे म्हटले आहे.
मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या महिलेचे नाव रुही शैलेश कुमार सिंह असून ती एक टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. नावामध्ये साम्य असल्याने अनेकांनी रुही शैलेश कुमार सिंह ऐवजी सोशल मीडियावर देखील रुही सिंगला टॅग केले आहे. या गोष्टीचा रुही सिंहला खूपच मनस्ताप होत आहे. तिने सोशल मीडियाद्वारे आपली बाजू मांडली आहे. तिने म्हटले आहे की, मी सगळ्यांना सांगू इच्छिते की, मीडियामध्ये रुही सिंग नावाच्या ज्या अभिनेत्रीची चर्चा आहे, तिचा आणि माझा काहीही संबंध नाहीये. केवळ तिचे आणि माझे नाव सारखे असल्याने लोकांचा गैरसमज होत आहे. कोणत्याही गोष्टीची तपासणी करूनच फोटोंचा वापर केला जावा. रुहीने शेअर केलेल्या या व्हिडिओत ती खूपच भावुक झालेली दिसत आहे.
अभिनेत्री रुही शैलेश कुमार सिंहच्याविरोधात पोलिसांसोबत मारहाण आणि मद्यपान करून गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिच्यासोबत असेलेल्या राहुल सिंह आणि स्वप्नील सिंह या तिच्या मित्रांनाही याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
सोमवारी रात्री उशिरा वांद्रे येथील एका मॉलजवळ रुही शैलेश कुमार सिंह आणि तिच्या चार मित्रांनी धिंगाणा घातला. यानंतर मॉलच्या सुरक्षारक्षकांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांशीसुद्धा त्यांनी हुज्जत घातली. याप्रकरणी एका अधिकाऱ्याने सांगितले की, रुही, स्वप्नील आणि राहुल या तिघांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी राहुल आणि स्वप्नील यांना अटक करण्यात आली तर रुहीला आणि इतर दोघांना जाण्यास परवानगी देण्यात आली.