‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या याविषयी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 06:03 PM2023-07-12T18:03:51+5:302023-07-12T18:06:29+5:30
ह्या पर्वाची आणखी एक खासियत म्हणजे ह्यावर्षी सुरेश वाडकर हे एका खास भूमिकेत बघायला मिळणार आहेत.
गेली १७ वर्ष आणि तब्बल १५ यशस्वी पर्व आणि भरभरून प्रेम मिळालेला एकमेव कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा ‘सा रे ग म प’. ह्या मंचाने अनेक उत्तमोत्तम गायक / गायिका महाराष्ट्राला आणि चित्रपट सृष्टीला दिल्या. मराठी संगीत क्षेत्रात ‘सा रे ग म प’ चं नाव नेहेमीच आदराने घेतलं गेलं आहे. ‘सा रे ग म प’ च्या प्रवासात अनेक पर्व झाली त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो “सा रे ग म प लिटिल चॅम्प्स”चा हे पर्व तुफान गाजलं ते म्हणजे ‘पल्लवी जोशी’ च्या खुमासदार सूत्रसंचालनाने आणि रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर ह्या पंचरत्नांमुळे. यंदाचं हे पर्व जरा वेगळे असणार आहे. संगीत कार्यक्रमातून हरवत चाललेल्या खरेपणा झी मराठी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे.
आजपर्यंत स्पर्धक ऑडिशनला येतात पण ह्यावेळी सारेगमपचे जजेस अखंड महाराष्ट्रातून प्रेक्षकांना भावणारे सूर शोधून आणणार आहेत आणि हि जबाबदारी ‘सलील कुलकर्णी’ आणि ‘वैशाली भैसने’ यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे. सलील कुलकर्णी यांनी याआधी सारेगमपचे परीक्षक म्हणून काम केले आहे पण सारेगमपची विजेती महागायिका वैशाली पहिल्यांदाच परीक्षण करणार आहे. ह्या पर्वाची आणखी एक खासियत म्हणजे ह्यावर्षी सुरेश वाडकर हे एका खास भूमिकेत बघायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा लागली आहे कि कधी सारेगमप वाहिनीवर सादर होणार आहे याची. त्यामुळे यंदाचं हे पर्व नाही तर प्रेक्षकांना सांगीतिक पर्वणी मिळेल यात शंका नाही.‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ ९ ऑगस्टपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.