"तुम्ही चक्कर येऊन पडलात तर आमच्याच डोक्याला ताप...", सचिन गोस्वामींना असं का म्हणाला पोलीस कर्मचारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 11:23 AM2024-05-23T11:23:07+5:302024-05-23T11:23:42+5:30
मतादानाच्या दिवशी सचिन गोस्वामींबरोबर घडला मजेशीर किस्सा, म्हणाले, "पांढऱ्या केसांमुळे..."
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मराठी टेलिव्हिजनवरील अत्यंत लाडका शो आहे. हा शो प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतो. हास्यजत्रेमुळे अनेक कलाकारांना ओळख मिळाली. या कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे दिग्दर्शक सचिन गोस्वामीदेखील हास्यजत्रेमुळे घराघरात पोहोचले. हास्यजत्रेमुळे त्यांच्या चाहत्या वर्गातही भर पडली आहे. नुकतंच गोस्वामींनी जबाबदार भारतीय नागरिकाचं कर्तव्य पार पाडत मतदान केलं. पण, मतदानाच्या ठिकाणी त्यांना वेगळाचा अनुभव आला. गोस्वामींनी त्यांच्या सोशल मीडियावरुन हा किस्सा सांगितला आहे.
सचिन गोस्वामी हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ते हास्यजत्रेच्या सेटवरील व्हिडिओही शेअर करतात. आता गोस्वामींनी शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. २० मे रोजी राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान झालं. गोस्वामींनीही यादिवशी मतदान करत त्याचं महत्त्व चाहत्यांना पटवून दिलं. आता त्यांनी मतदानाच्या दिवशी केंद्रावर घडलेला एक मजेशीर किस्सा फेसबुक पोस्टमधून सांगितला आहे.
गोस्वामींची फेसबुक पोस्ट
काल मतदानाला मी आणि सविता सकाळीं ७:३० वाजता केंद्रावर गेलो...नेमका आमचा नंबर असलेल्या खोलीबाहेर मोठी रांग...ड्युटीवरील पोलीस कर्मचारी मला निरखून बघत अंदाज काढत होता. शेवटी त्याने निष्कर्ष काढला आणि मला म्हणाला, "ओ तुम्ही तिथं का रांगेत? या इकडे इकडून आत जा".
मी गडबडलो...बराच वेळ उभं राहिल्याने पोटऱ्यात गोळे आले होतेच...पडत्या फळाची आज्ञा म्हणून तिथं जाऊन थांबलो...आता मी ३ नंबर वर होतो..हळूच त्यांच्याकडे पाहून हसत थँक्यू म्हटलं.
त्यावर तो म्हणाला, "ओ, सिनियर सिटिझन रांगेत चक्कर येऊन पडले तर डोक्याला ताप आम्हालाच होणार नाही का?" पांढऱ्या केसांनी सिनियर सिटिझन कॅटेगरीत आणलं आहे...काय करावं...
सचिन गोस्वामींच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. गोस्वामींची ही पोस्ट पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. एकाने कमेंट करत "सर तुम्ही आजही तरूण आहात" अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने "सिनियर म्हणून नाही राजपुत्र म्हणून पुढे जागा दिली" असं म्हटलं आहे. "खूपच लवकर सचिन जी. मला काही सोडले नाही. सांगून पण की मी ७० वर्षाचा होऊन गेलो आहे. आधार कार्ड दाखवून दिले तरीपण", अशी कमेंटही केली आहे.