90च्या दशकातील ‘तू-तू मैं-मैं’ मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला; 'ही' अभिनेत्री सासूच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 06:16 PM2023-05-14T18:16:39+5:302023-05-14T18:17:26+5:30
Tu Tu Main Main: 90च्या दशकात प्रचंड गाजलेली या मालिका रिमा लागू यांनी सासूची भूमिका साकारली होती. तर, सुप्रिया पिळगांवकर सुनेच्या भूमिकेत होती.
90च्या दशकात प्रचंड गाजलेली मालिका म्हणजे तू-तू मैं-मैं (Tu Tu Main Main). ही मालिका त्या काळात प्रदर्शित झाली आणि पाहता पाहता लोकप्रिय झाली. रिमा लागू आणि सुप्रिया पिळगांवकर यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेची क्रेझ आजही कमी झालेली नाही. त्यामुळेच या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी ही मालिका पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
सासू-सुनेमधील दररोजच्या आयुष्यात घडणारी कुरबुरी या मालिकेत उत्तमरित्या सादर करण्यात आली होती. या मालिकेचं दिग्दर्शन अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांनीच या मालिकेच्या नव्या भागाविषय़ी मोठी घोषणा केली आहे.
तू-तू मैं-मैं ही मालिका २६ जुलै १९९४ साली प्रदर्शित झाली होती. त्यानंतर बरीच वर्ष तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर आता या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका मुलाखतीत मालिकेचे दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी या मालिकेविषयी मोठी घोषणा केली.
“या मालिकेला नव्याने प्रेक्षकांसमोर आणण्याची मी तयारी करत आहे. या मालिकेच्या पहिल्या भागात सुप्रिया सुनेची भूमिका साकारत होती, तर आता या दुसऱ्या भागामध्ये ती सासूच्या भूमिकेत दिसेल,” असं सचिन पिळगांवकर म्हणाले.
पुढे ते म्हणतात, “ या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला तेव्हा आजची तरुण पिढी लहान होती. हीच लहान मुलं ही मालिका पाहात पाहात मोठी झाली. त्यावेळी रीमा लागू यांचं हिंदी मनोरंजनसृष्टीतही मोठं नावं होतं, तर सुप्रिया हिंदी मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी नवी होती. पण मालिका सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांच्या काळातच प्रेक्षकांनी या दोघींनाही अक्षरशः डोक्यावर घेतलं.”
दरम्यान, सचिन यांनी या नव्या भागाच्या तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, ती नेमकी कधी प्रसारित होणार हे मात्र, अद्याप स्पष्ट केलेलं नाही. तसंच सुप्रिया सासूच्या भूमिकेत आहे. तर, सुनेची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठीही प्रेक्षक उत्सुक आहेत.