Sagar Karande सागर कारंडेला साडी नेसण्याचा आलाय कंटाळा, अभिनेता म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 10:23 AM2024-07-15T10:23:35+5:302024-07-15T10:24:28+5:30
Sagar Karande : नुकताच सागर कारंडेचा बाई गं हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात त्याने स्वप्नील जोशीच्या मित्राची भूमिका साकारली आहे. त्याची भूमिका प्रेक्षकांना भावली आहे.
अभिनेता सागर कारंडे (Sagar Karande) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमात काम केले. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात लोकप्रिय झाला. आता तो 'बाई गं' (Bai Ga Movie) या चित्रपटात पाहायला मिळाला. यात त्याच्याशिवाय स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, नेहा खान, नम्रता गायकवाड, सुकन्या मोने हे कलाकार आहेत. दरम्यान आता त्याने एका मुलाखतीत त्याला साडी नेसण्याचा कंटाळा आला असल्याचे सांगितले.
नुकताच सागर कारंडेचा बाई गं हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात त्याने स्वप्नील जोशीच्या मित्राची भूमिका साकारली आहे. त्याची भूमिका प्रेक्षकांना भावली आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने सागरने त्याच्या मनातली गोष्ट आज बोलून दाखवली आहे. चला हवा येऊ द्या मध्ये सागर कारंडेने अनेक स्त्री पात्र रंगवले होते. पण या सर्वांचा त्याला कुठेतरी कंटाळा वाटू लागला.
साडी नसलेला सागर कारंडे मी कधी बघणार?
सागर म्हणाला की, मी बऱ्याच कार्यक्रमात सतत तेच करत होतो. पण ह्यातून मी बाहेर कधी पडणार असं मला झालं होतं. साडी नसलेला सागर कारंडे मी कधी बघणार?. मला सागर कारंडे अशी ओळख बनवायची होती. पण चित्रपटाच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली याबद्दल मी दिग्दर्शक आणि स्वप्नील जोशीचे आभार मानतो. स्वप्नील दादा सोबत मी अगोदर एक चित्रपट केला होता त्यामुळे त्याच्या सोबत काम करायला मला खूप मजा आली. या चित्रपटात मी सागर म्हणूनच काम करतोय आणि प्रेक्षकांनाही माझी भूमिका आवडतेय.
साडी नेसायला वेळ लागतो
स्त्री भूमिका साकारताना अगोदर खूपच त्रासदायक वाटत असल्याचे तो सांगतो. कारण साडी नेसणे, पदर सांभाळणे या खूप कठीण गोष्टी आहेत. पण कालांतराने त्याची सवय होत गेली. पण या भूमिका साकारल्यानंतर माझ्यात खूप बदल झाला. अगोदर बायकोला आवरायला खूप उशीर होतो म्हणून तिच्या मागे लागायचो पण साडी नेसायला वेळ लागतो हे कळल्यावर मीच आता घाई करणं थांबवलं आहे. माझ्यातला हा सकारात्मक बदल झाल्याने कुटुंबातही वाद, चिडचिड होत नाही अशी कबुलीही त्याने दिली.