सहकुटुंब सहपरिवार: सरिताच्या पायावर नाक घासून ज्योती मागणार माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 15:55 IST2022-06-05T15:55:26+5:302022-06-05T15:55:46+5:30
Sahkutumb Sahparivar: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अंजी आणि अवनी, ज्योतीला घराच्या चाव्या सरुकडे देण्यास सांगतात.

सहकुटुंब सहपरिवार: सरिताच्या पायावर नाक घासून ज्योती मागणार माफी
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक चढाओढ येत असल्याचं पाहायला मिळालं. ज्योतीच्या येण्यामुळे मोरे कुटुंबीय एकमेकांपासून दुरावले होते. परंतु, सरुने या घरात पाय ठेवताच तिने पुन्हा सगळी नाती जुळवून आणली. त्यामुळे पुन्हा एकदा मोरे कुटुंबीय एकत्र आले आहेत. इतकंच नाही तर ज्योतीने केलेल्या चुकांची शिक्षाही तिला भोगावी लागत आहे.
ज्योतीमुळे सरुला घर सोडू जावं लागलं होतं. मात्र, आता सरु घरी परतली असून तिने घराचा ताबा घेतला आहे. तसंच ज्योतीमुळे संपूर्ण मोरे कुटुंबाला झालेल्या त्रासाचा बदलादेखील घेताना ती दिसत आहे. त्यामुळे सध्या ज्योती मोरे कुटुंबात घर काम करणारी बाई म्हणून राहात आहे. यामध्येच आता ज्योतीला घराच्या चाव्या सरुच्या हातात द्यावा लागणार असून तिला सगळ्यांसमोर नाकदेखील रगडावं लागणार आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अंजी आणि अवनी, ज्योतीला घराच्या चाव्या सरुकडे देण्यास सांगतात. इतकंच नाही तर तिने सरुची जागा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सगळ्यांसमोर तिने नाक घासरुन सरुची माफी मागावी असंही सांगतात. परिणामी, ज्योतीला सरुसमोर नाक घासावं लागतं.
दरम्यान, ज्योतीचं सत्य बाहेर आल्यावर सूर्या तिला खडे बोल सुनावतो. इतकंच नाही तर घरातील प्रत्येक व्यक्तीला वेगळं करण्यामागे ज्योतीने कशी कटकारस्थानं रचली हेदेखील सर्वांसमोर येतं. त्यामुळे मालिकेत सध्या रंजक वळण आलेलं आहे. मात्र, मोरेंच्या कुटुंबात निमूटपणे काम करणाऱ्या ज्योतीच्या डोक्यात नेमके कसले विचार आहेत. ती खरंच सुधारली आहे की मोरे कुटुंबाचा बदला घेणार हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.