आदिती-सिद्धार्थच्या साखरपुड्यात मीठाचा खडा; महालक्ष्मीचा डाव होणार का यशस्वी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 18:20 IST2021-11-25T18:20:00+5:302021-11-25T18:20:00+5:30
Tujhya majhya sansarala aani kay hava: असंख्य मालिकांच्या गर्दीत ही मालिका तिचं वेगळेपण जपत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

आदिती-सिद्धार्थच्या साखरपुड्यात मीठाचा खडा; महालक्ष्मीचा डाव होणार का यशस्वी ?
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' (Tujhya majhya sansarala aani kay hava). सध्या असंख्य मालिकांच्या गर्दीत ही मालिका तिचं वेगळेपण जपत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व या मालिकेच्या माध्यमातून उलगडण्यात येत आहे. एकीकडे विभक्त कुटुंब पद्धतीत वाढलेल्या आदितीला सिद्धार्थचं एकत्र कुटुंब आवडू लागलं आहे. त्यामुळे या घराची सून होण्याची ती स्वप्न रंगवत आहे. परंतु, तिच्या आईला महालक्ष्मीला हे मान्य नसल्यामुळे ती अनेक विघ्न मध्ये आणतांना दिसत आहे. असाच प्रकार ती आदिती-सिद्धार्थच्या साखरपुड्याच्या दिवशी करणार आहे.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आदिती-सिद्धार्थच्या साखरपुड्याच्या दिवशी तिचा बालपणीची मित्र येतो. मात्र, हा केवळ मित्र नसून त्याचं तिच्यावर प्रेम असल्याचं सांगतो. त्यामुळे ऐन साखरपुड्यात गोंधळ उडतो. विशेष म्हणजे आदिती-सिद्धार्थचा साखरपुडा होऊ नये यासाठी महालक्ष्मीनेच हा प्लॅन आखलेला असतो.
'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं': मुंबईपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर सुरु आहे मालिकेचं शुटींग
दरम्यान, महालक्ष्मी आदिती-सिद्धार्थचा साखरपुडा मोडण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र, आदितीचा प्रियकर म्हणून आलेल्या मुलाचा आवाज ऐकल्यावर हा काहीतरी बनाव असल्याचं सिद्धार्थ आणि कुटुंबीयांच्या लक्षात येतं. परंतु, तरीदेखील आदिती या संपूर्ण प्रकाराचं स्पष्टीकरण देते.
तर, दुसरीकडे महालक्ष्मीचा डाव फसल्यामुळे ती युवराज आणि त्याच्या कुटुंबावर आगपाखड करत आहे. त्यामुळे आता महालक्ष्मी आदिती-सिद्धार्थचा साखरपुडा मोडण्यासाठी आणखी कोणता नवा डाव आखणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.