अज्याचा जवानांना सलाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 01:28 PM2018-08-14T13:28:21+5:302018-08-15T07:15:00+5:30
नऊ-दहा महिन्याचं आर्मी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर देशसेवेची शप्पथ घेतात आणि खऱ्या अर्थानं फौजी बनतात. हा शप्पथ घेण्याचा अभूतपूर्व सोहळा ‘कसम परेड’ या नावानं ओळखला जातो.
‘लाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या मालिकेने गेल्या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असे व्यक्तीरेखा म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून ते फौजी बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. नऊ - दहा महिन्याचं आर्मी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर देशसेवेची शप्पथ घेतात आणि खऱ्या अर्थानं फौजी बनतात. हा शप्पथ घेण्याचा अभूतपूर्व सोहळा ‘कसम परेड’ या नावानं ओळखला जातो. हा सोहळा फक्त फौजींच्या कुटुंबीयांनाच अनुभवायला मिळतो. पण 'लागीर झालं जी' या मालिकेमुळे प्रेक्षकांना हा कसम परेडचा सोहळा पाहायला मिळाला.
स्वतंत्र दिनाच्या निमित्त नितीशने त्याच्या फौजी साकारण्याचा अनुभव आणि त्याच्या जवानांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. नितीश म्हणाला, "मी ट्रेनिंगसाठी बेळगावला गेलेलो.तिथे मी ३ दिवसाचं ट्रेनिंग घेतला.पहिल्या दिवशी ऑब्स्टॅकल्स, दुसरा दिवशी कसम परेड आणि तिसरा दिवस वॉर सिक्वेन्ससाठी गेला. ऑब्स्टॅकल्सच ट्रेनिंग हे खूप ऍडव्हान्स आणि अवघड असतं ते शिकायला ६ महिने लागतात. ते मी एका दिवसात पूर्ण केलं आणि ते ओरिजनल रायफल घेऊन करायचं असतं. ते करताना रायफल माझ्या डोक्याला लागली आणि त्यामुळे मला चक्कर आली.सगळे बोलत होते कि आपण थोडा वेळ थांबून मग ट्रेनिंग पूर्ण करूया पण ते ट्रेनिंग करताना माझ्यात खूप जिद्द आली आणि त्यामुळे ते ट्रेनिंग मी सलग पूर्ण केलं.
तसंच कसम परेडचं ट्रेनिंग घेताना देखील तिथल्या कॅप्टन्सनी मला शाबासकी दिली. तिसऱ्या दिवशी मी फायरिंग केली. वॉर सिच्युएशन असताना कसं क्रॉउलिंग करून डोंगराच्या आड राहून फायरिंग करणं याच सर्व ट्रेनिंग तिसऱ्या दिवशी झालं. हे ट्रेनिंग झाल्यावर ब्रिगेडीअन सर्व मुलांना मेडल देतात.या ट्रेनिंगमध्ये मी इतका समरस होऊन गेलेलो कि त्या ब्रिगेडीअन्सना खरंच नव्हतं वाटत कि मी एक अभिनेता आहे आणि हे सर्व मी मालिकेसाठी करतोय. मी या मालिकेत एका जवानाचं आयुष्य जगतोय आणि ते प्रेक्षकांसमोर सादर करतोय पण त्यांचं आयुष्य हे खरंच खडतर असतं. नुकतंच मालिकेत विक्रम शाहिद झाला आणि त्यामुळे एक जवान शाहिद झाल्यावर त्याच्या परिवारावर काय परिस्थिती ओढवते हे मी खूप जवळून पाहिलंय आणि अनुभवलं. त्यामुळे माझ्या मनात जवानांबद्दल असीम आदर आहे. ते सीमेवर दिवसरात्र लढतात म्हणून आपण इकडे सुखाने जगू शकतो. ते स्वतःच परिवार मागे ठेवून तिकडे स्वतःच्या प्राणाची बळी देतात, त्यामुळे त्यांच्या कुटुंबांची ताकद आपण बनलं पाहिजे.”