'संभाजी ' मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 04:29 AM2017-09-08T04:29:33+5:302017-09-08T09:59:33+5:30
छोट्या पडद्यावर आजवर विविध ऐतिहासिक महापुरुषांच्या गाथा मालिका रुपात रसिकांच्या भेटीला आल्या आहेत. यांत छत्रपती शिवाजी महाराज, पेशवा बाजीराव, ...
छ ट्या पडद्यावर आजवर विविध ऐतिहासिक महापुरुषांच्या गाथा मालिका रुपात रसिकांच्या भेटीला आल्या आहेत. यांत छत्रपती शिवाजी महाराज, पेशवा बाजीराव, चक्रवर्ती सम्राट अशोक, गौतम बुद्ध, झाशीची राणी लक्ष्मीबाई, टीपू सुल्तान, महाराजा रणजित सिंग, महाराणा प्रताप अशा अनेक ऐतिहासिक थोर महापुरुषांच्या गाथा मालिका रुपात रसिकांच्या भेटीला आल्या. या महापुरुषांचं बालपण, त्यांची शौर्यगाथा आणि त्यांच्या जीवनातील चढउतार या मालिकेतून दाखवण्यात आले. या मालिकांना रसिकांचंही भरभरुन प्रेम मिळालं. मराठीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाच्या यांच्या जीवनावरील राजा शिवछत्रपती ही मालिका तर तुफान गाजली. आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एका थोर महापुरुषाची गाथा मराठी रसिकांना पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विविध मालिका आणि सिनेमांमधून रसिकांनी अनुभवला आहे. शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी राजे यांच्या जीवनावर आणि त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी 'संभाजी' ही नवी मालिका लवकरच मराठी रसिकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतून छत्रपती संभाजी राजे यांची शौर्य गाथा रसिकांना अनुभवता येणार आहे. आजवर शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे वर्णन करणा-या विविध मालिका आणि सिनेमा रसिकांनी पाहिले आहेत. मात्र त्यांचे पुत्र संभाजीराजे यांच्या जीवनावर कोणती कलाकृती समोर आली नव्हती. त्यामुळेच छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला येणा-या संभाजी या मालिकेतून रसिकांना संभाजी राजे यांच्या जीवनाचे विविध पैलू अनुभवता येणार आहेत. नुकतंच या आगामी मालिकेचे प्रोमो झळकण्यास सुरुवात झाली आहे. यांत प्रोमोमध्ये सन 1706 चा काळ दाखवण्यात आला आहे. त्यात औरंगजेबाच्या छावणीमधील एक दृष्य दाखवण्यात आले आहे. यांत औरंगजेब जीवनाच्या अखेरच्या घटका मोजत असल्याचे पाहायला मिळत आहे. संभाजीराजेंसारखा पुत्र असता तर त्याच्या खांद्यावर सगळी धुरा सोपवून मी निश्चिंतपणे जगाचा निरोप घेतला असता असा औरंगजेबाचा डायलॉग दाखवण्यात आला आहे. सईबाईंच्या निधनानंतर जिजाऊंच्या देखरेखीखाली संभाजी महाराज लहानाचे मोठे होत होते. त्यामुळे वडील शिवाजी महाराजांना पाहतच संभाजीराजे मोठे झाले. आपल्या छोट्याशा कारकिर्दीत संभाजीराजेंनी शिवरायांचा पुत्र शोभावा अशी कामगिरी रणांगणावर केली. संभाजीराजे यांच्या पराक्रमाच्या विविध गोष्टी मराठी रसिकांना या मालिकेच्या माध्यमातून घरबसल्या अनुभवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे संभाजी या मालिकेबाबत त्यांच्या मनात नक्कीच उत्सुकता असेल.