'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत संभाजीराजे आणि दिलेर खान प्रकरणाचा होणार उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 04:23 PM2018-07-19T16:23:38+5:302018-07-19T16:24:15+5:30
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे वारसदार संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी आज विविध बाजूंनी प्रयत्न केले जात आहेत. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका त्याच प्रयत्नांचा एक भाग. चित्रीकरण मालिकेला अल्पावधीतच रसिकांची भरपूर पसंती मिळाली आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला खूप लोकप्रिय केलंय. ‘जगदंब क्रिएशन’ची निर्मिती असलेल्या झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होतो आहे. यात आता संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या एका प्रकरणाचा उलगडा होणार आहे. हे प्रकरण आहे संभाजीराजे आणि दिलेर खान प्रसारित होणाऱ्या विशेष भागात या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.
शंभुराजे दिलेरखानाकडे श्री क्षेत्र माहुली येथून नदी ओलांडून गेले अशी इतिहासात नोंद आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' च्या टीमने याच ठिकाणी चित्रीकरण करत एक अनोखा योग साधला आहे. हा योग साधताना 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या संपूर्ण टीमने अक्षरश: तारेवरची कसरत करत जिद्दीने हे चित्रीकरण पूर्ण केले. चित्रीकरणादरम्यान असलेला धुवाधार पाऊस आणि कृष्णावेण्णेच्या पाण्याला आलेला पूर या सगळ्यावर मात करत संभाजीच्या टीमने चित्रित केलेल्या या रोमहर्षक भागाचा आस्वाद आपल्याला आजच्या भागात घेता येणार आहे. जिथे इतिहास घडला त्याभागात चित्रीकरण करण्याचा कलाकारांचा अविस्मरणीय अनुभव रसिकांना पाहता येणार आहे.
या मालिकेचे निर्माते डॅा. घनश्याम राव, विलास सावंत, अमोल कोल्हे असून दिग्दर्शन विवेक देशपांडे, कार्तिक केंढे यांचे आहे. डॅा. अमोल कोल्हे, शंतनू मोघे, स्नेहलता वसईकर, पल्लवी वैद्य, प्राजक्ता गायकवाड आदी कलाकारांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.