वाटले आता मी मरणार...! अभिनेत्रीने सांगितला अनुभव, सात रूग्णालयांनी भरती करण्यास दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 10:19 AM2020-05-07T10:19:23+5:302020-05-07T10:22:03+5:30
आता आपण मरणार, अशा अवस्थेत असताना एका रूग्णालयाने तिला भरती करून घेतले आणि तिच्या जीवात जीव आला.
अभिनेत्री संभावना सेठ हिची प्रकृती बिघडल्याने अलीकडे तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या पतीने याबद्दल माहिती दिली होती. आता खुद्द संभावना यावर बोलली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा अनुभव खूपच वाईट होता, असे ती म्हणाली. याचे कारण काय तर 7 रूग्णालयांनी तिला भरती करून देण्यास नकार दिला. आता आपण मरणार, अशा अवस्थेत असताना एका रूग्णालयाने तिला भरती करून घेतले आणि संभावनाच्या जीवात जीव आला. संभावनाने हा संपूर्ण अनुभव सांगितला आहे.
टाईम्स आॅफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले, ‘ अनेक वर्षांपासून सर्दी आणि खोकल्याचा मला त्रास आहे. एकदा सर्दी-खोकला उलटून आला की, त्यातून बरे व्हायला मला 20 दिवस लागतात. गेल्या महिन्यात मला सर्दी-खोकला झाला. माझी औषध सुरु होती. पण मी याबद्दल कुणालाच सांगितले नाही. कारण लोक मला कोरोना रूग्ण समजतील, अशी मला भीती होती. नेहमीप्रमाणे औषधांनी आराम मिळेल, असे मला वाटले. पण रविवारी संध्याकाळी माझी प्रकृती बिघडली़ इतकी की, मला anxiety अटॅक आला. माझ्या पतीने ब्लड प्रेशर तापसले़ ते खूप वाढले होत. यानंतर मला चक्कर यायला लागले. माझ्या डाव्या कानात असह्य वेदना सुरु झाल्यात. अस्वस्थ वाटत असूनही मी रात्री घरात फे-या मारत राहिले. कारण मी बसले तर चक्कर येईल, असे मला वाटत होते.
सोमवारी पहाटे कानातील वेदना इतक्या असह्य होत्या की मी रूग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही रूग्णालयात निघालो. पण एकही रूग्णालय मला भरती करून घेण्यास तयार नव्हते. आम्ही 7 हॉस्पीटल फिरलो. पण आम्हाला एन्ट्री गेटमधूनच हुसकावून लावण्यात आले. मी कोविड 19 ची रूग्ण आहे, अशी भीती त्यांना कदाचित वाटत होती. अखेर एका रूग्णालयाने माझे टेम्परेचर चेक केल्यानंतर तुम्हाला ENT स्पेशालिस्टची गरज असल्याचे सांगितले. मात्र आमच्या रूग्णालयात ही सेवा उपलब्ध नसल्याचेही सांगून त्यांनीही आम्हाला घरी जायला सांगितले. अखेर आम्ही घरी आलो. ’
पुढे तिने सांगितले, ‘घरी परतल्यावर मी तासभर झोपले. पण उठल्यानंतर पुन्हा वेदना असह्य सुरु झाल्यात. आता मी मरणार, असे मला वाटू लागले होते. मंगळवारी सकाळी एका डॉक्टरांशी आम्ही बोललो. त्यांनी मला 15 मिनिटांत रूग्णालयात पोहोचायला सांगितले. जणू देवाने त्यांना आमच्यासाठी पाठवले होते. माझ्या कानात इन्फेक्शन झाले होते. हा अनुभव भयावह होता. या अनुभवानंतर असे वाटतेय जणू आपण कोरानाने नंतर आणि आरोग्याशी निगडीत अन्य गंभीर आरोग्य समस्यांनी आधी मरू. कदाचित माझ्यासारखेच अनेक या अनुभवातून गेले असतील.’