'तुमच्या लग्नाच्या पत्रिकाही...?' स्पर्धकाने संगीता बिजलानीला थेट विचारला प्रश्न, अभिनेत्री म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 11:55 IST2024-12-29T11:53:36+5:302024-12-29T11:55:02+5:30
संगिता बिजलानीने पहिल्यांदाच सलमान खानसोबतच्या लग्नाच्या प्रश्नावर नॅशनल टेलिव्हिजनवर उत्तर दिलं आहे.

'तुमच्या लग्नाच्या पत्रिकाही...?' स्पर्धकाने संगीता बिजलानीला थेट विचारला प्रश्न, अभिनेत्री म्हणाली...
दबंग भाईजान सलमान खानने (Salman Khan) नुकताच ५९ वा वाढदिवस साजरा केला. मित्रपरिवारासह त्याने जंगी सेलिब्रेशन केलं. सलमान खान अद्यापही अविवाहित आहे त्यामुळे त्याची नेहमीच चर्चा होते. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत (Sangeeta Bijlani) त्याचं लग्न ठरलं होतं. इतकंच नाही तर लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या अशा बातम्या नेहमीच येतात. हे खरं आहे की खोटं यावर पहिल्यांदाच संगिता बिजलानीनेच नॅशनल टेलिव्हिजनवर उत्तर दिलं आहे.
संगीता बिजलानीने नुकतीच 'इंडियन आयडॉल' मध्ये पाहुणी म्हणून हजेरी लावली. याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी मंचावर आलेल्या रितिका राज सिंह या स्पर्धक गायिकेने संगिता बिजलानीला थेटच प्रश्न विचारला. तुमच्या आणि सलमान खानच्या लग्नाच्या पत्रिका छापल्या गेल्या होत्या हे खरं आहे का? हा प्रश्न ऐकताच परीक्षक श्रेया घोषाल आणि विशाल ददलानीही शॉक झाले. संगिता बिजलानीला या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता आलं नाही. ती म्हणाली, "हो, हे खोटं तर नाहीए."
संगिताचं उत्तर ऐकताच विशाल ददलानीही तेवढ्यात विचारुन घेतो की 'नंतर काय झालं? यामागे नक्की काय गोष्ट आहे?'. आता संगीता यावर अधिक काय बोलते हे एपिसोड पाहूनच कळेल. मात्र सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
संगीता बिजलानी आणि सलमान खान ८ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचंही लग्नही ठरलं. लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या. मात्र त्याआधीच दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आणि लग्नच रद्द झालं. सलमान खानने संगीताचा विश्वासघात केला आणि तो सोमी अलीसोबत रंगेहात पकडला गेला अशा चर्चा नंतर झाल्या होत्या. मात्र खरं कारण दोघांनीही कधीच सांगितलं नाही. दोन वर्षांपूर्वी सलमान आणि संगीता बिजलानी यांच्यात पुन्हा प्रेम उफाळून आलं होतं. सलमानने संगीताच्या कपाळावर किस केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.