संगीता घोष या कारणामुळे घेते अभिनयातून ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 06:30 AM2019-03-01T06:30:00+5:302019-03-01T06:30:04+5:30
संगीताच्या आजवरच्या करियरचा विचार केला तर ती नेहमीच तिच्या दोन मालिकांमध्ये काही महिन्यांचा तरी ब्रेक घेते. आता देखील काही महिन्यांच्या ब्रेकनंतर ती दिव्य दृष्टी या मालिकेत झळकणार आहे.
संगीता घोषने हम हिंदुस्थानी या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेच्या वेळी ती केवळ दहा वर्षांची होती. त्यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. आजवर ती कुरूक्षेत्र, अधिकार, अजीब दास्तान, दरार यांसारख्या मालिकांमध्ये झळकली आहे. पण तिला देस में निकला होगा चाँद या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तसेच मेहेंदी तेरे नाम की या मालिकेत तिने साकारलेली मुस्कान ही भूमिका चांगलीच गाजली. ती झलक दिखला जा या रिअॅलिटी शो मध्ये देखील झळकली होती. २०१० नंतर ती छोट्या पडद्यापासून गायब झाली होती. काही वर्षांपूर्वी कहता है दिल जी ले जरा या मालिकेद्वारे ती छोट्या पडद्यावर परतली. तसेच तिने परवरिश या मालिकेत देखील काम केले. परवरिश या मालिकेनंतर काही महिने ती कोणत्याच मालिकेत झळकली नाही. ती गेल्या वर्षी चक्रव्यूह या मालिकेत दिसली होती आणि आता दिव्य दृष्टी या मालिकेत एक वेगळी भूमिका साकारणार आहे.
संगीताच्या आजवरच्या करियरचा विचार केला तर ती नेहमीच तिच्या दोन मालिकांमध्ये काही महिन्यांचा तरी ब्रेक घेते. आता देखील काही महिन्यांच्या ब्रेकनंतर ती दिव्य दृष्टी या मालिकेत झळकणार आहे. स्टार प्लसवरील दिव्य दृष्टी मालिकेत संगीता पिशाचिनी या खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. दिव्य दृष्टी ही मालिका अंगी विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीकडे भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची शक्ती आहे; तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्याकडे आहे. या मालिकेत संगीतासोबतच सना सय्यद, नायरा बॅनर्जी यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
आपल्या भूमिकेविषयी संगीता सांगते, “मी जी व्यक्तिरेखा साकारते, तिच्याशी मी मनाने जोडली जाते. ती भूमिका आणि आणि तिची वैशिष्ट्यं जाणून घेतल्यावर एखादी भूमिका रंगवणं मला सोपं जातं. पण त्यामुळे कमी काळात वेगवेगळ्या भूमिका मला स्वीकारता येत नाहीत. कारण मी जी व्यक्तिरेखा साकारणार असते, तिच्यात मी मनाने गुंतलेली असते आणि त्यामुळे मला दुसऱ्या भूमिकेच्या अंतरंगात प्रवेश करताना वेळ लागतो. तसंच टीव्हीवर मालिका साकारताना कलाकार हे दिवसाचे बहुतेक तास चित्रीकरणात व्यग्र असतात आणि त्यांना स्वत:साठी तसंच आपल्या कुटुंबियांसाठी मोकळा वेळच मिळत नाही. आम्ही मालिकेचे चित्रीकरण करत असताना आम्हाला चित्रपट पाहणं, वाचन करणं तसंच विविध माणसांचं निरीक्षण करणं यासाठी वेळच उपलब्ध नसतो. म्हणूनच नव्या मालिकेत भूमिका स्वीकारण्यापूर्वी मी काही काळ ब्रेक घेते.”