"...आता मुलांना सोडून जाताना मी तसाच रडतो", संकर्षण कऱ्हाडेची भावुक करणारी कविता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 10:59 AM2024-02-28T10:59:01+5:302024-02-28T11:00:17+5:30

परदेशात मुलांच्या आठवणीत संकर्षण भावुक, शेअर केली कविता

sankarshan karhade emotional poem for childrens and father shared post | "...आता मुलांना सोडून जाताना मी तसाच रडतो", संकर्षण कऱ्हाडेची भावुक करणारी कविता

"...आता मुलांना सोडून जाताना मी तसाच रडतो", संकर्षण कऱ्हाडेची भावुक करणारी कविता

संकर्षण कऱ्हाडे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांतून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनेत्याबरोबरच संकर्षण उत्तम कवीदेखील आहे. त्याच्या अनेक कविता सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. आताही त्याने पोस्टच्या माध्यमातून एक कविता शेअर केली आहे. या कवितेतून त्याने बाप-मुलांच्या नात्यावर भाष्य केलं आहे. त्याबरोबरच्या त्याच्या मुलांना त्याने भावनिक सादही घातली आहे. 

संकर्षण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबद्दलचे अपडेट्स तो चाहत्यांना देत असतो. सध्या संकर्षण त्याच्या 'नियम व अटी लागू' या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. या नाटकाच्या प्रयोगासाठी संकर्षण परदेशी दौरेही करत आहे. 'नियम व अटी लागू'च्या निमित्ताने सध्या संकर्षण लंडन दौऱ्यावर आहे. पण, लंडनला जाताना तो भावुक झाला आहे. एअरपोर्टवरील फोटो शेअर करत त्याने पोस्ट लिहिली आहे. "नियमवअटीलागू च्या प्रयोगांसाठी लंडन ला निघालोय. १ मार्च लिड्स , २ मार्च केंट , ३ मार्च सेंट्रल लंडन असे प्रयोग आहेत..प्रवासाला निघतांना मुलांच्या आठवणीत काही सुचलंय...खाली लिहितोय.. वाचा...आवडलं तर सांगा आणि शुभेच्छा असु द्या," या पोस्टमधून त्याने कविता मांडली आहे. 

संकर्षण कऱ्हाडेची कविता

मी लहान असतांना माझे बाबा
बदलीच्या गावी जायचे
आठवडाभर तिकडेच
शनिवार रविवार यायचे

 

शनिवार रात्री मी त्यांची
खूप वाट पहायचो
सोमवार पहाटे ते निघणार
मी रविवार पासून रडायचो

मी जरी बाबा झालोय
भावनेत धडपड करतोचे
आता मुलांना सोडून जातांना
मी तस्साच रडतोचे

आत्ता जे माझं होतंय
तेच बाबांचं व्हायचं का ..?
त्यांनाही माझ्यासारखंच
लपून छपून रडू यायचं का ..??

बाळ बाबाचा बाबा बाळाचा
सहवास सतत मागतं
पण काय करणार कामासाठी
लांssssब जावं लागतं

ऐकेल तो माझं नक्की
जर पहात असेल देव
माझ्या बाळांना आणि माझ्या बाबांना
आयुष्यंभर सुखांत ठेव ….!!!!

- संकर्षण गोविंद कऱ्हाडे

संकर्षणने मालिका आणि नाटकांमध्ये अभिनय करण्याबरोबरच 'आम्ही सारे खवय्ये' या शोचं सूत्रसंचालनही केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'तीन अडकून सीताराम' या सिनेमात तो झळकला होता. 

Web Title: sankarshan karhade emotional poem for childrens and father shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.