"आईच्या पायावर डोकं ठेवा", संकर्षणची कविता ऐकून कलाकारांचे डोळे पाणावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 04:20 PM2024-10-27T16:20:59+5:302024-10-27T16:21:39+5:30

संकर्षण कऱ्हाडे याची कविता सोशल मीडियावर अवघ्या काही तासांत व्हायरल झाली.

Sankarshan Karhade Emotional Poem For Mother Watch Video | "आईच्या पायावर डोकं ठेवा", संकर्षणची कविता ऐकून कलाकारांचे डोळे पाणावले!

"आईच्या पायावर डोकं ठेवा", संकर्षणची कविता ऐकून कलाकारांचे डोळे पाणावले!

Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडे हा एक उत्तम अभिनेता तर आहेच. शिवाय तो संवेदनशील कवीसुद्धा आहे. 'संकर्षण व्हाया स्पृहा' या कवितांच्या कार्यक्रमातून तो रसिकांचं मनोरंजन करत असतो. नुकत्याच एका कार्यक्रमात त्याने आईसाठी कविता सादर केली आणि अवघ्या काही तासांतच त्याच्या कवितेचा व्हिडीओ व्हायरल झाला.

संकर्षण कऱ्हाडे याची कविता सोशल मीडियावर अवघ्या काही तासांत व्हायरल झाली. यावर प्रतिक्रियांचा नुसता पाऊस पडला. 'झी मराठी' वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याला अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने आईबाबत सादर केलेली कविता अनेकांच्या मनाला भावली. यावेळी संकर्षणच्या या कविता ऐकून इतर कलाकार मंडळींचे अश्रू अनावर झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.


संकर्षण कविता...


आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा,
आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा,

आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडलंय,
आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय,

बरं तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता,
बरं तुम्ही सांगा तुमच्या आईचा फेव्हरेट कलर कोणता?,

आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीय,
पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीय,

तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून देतो?,
तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो,

तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येत भरुन,
आपण मात्र बोलताना शिव्या आईवरुन,

लक्षात ठेवून सतत ती हात पसरते, नशिबापुढे, देवापुढे,
पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते,

आईची आई होऊन कधीतरी बाळांनो वागा नं,
तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा नं,

कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते,
आईने कडेवर घेतल्यावरचं आपली उंची वाढते,

उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता,
आईच्या पोटी जन्माला येतात अन् देव कुठे म्हणता,

आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्या प्रेमाची धुंदी,
बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी,

नका करु स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा,
जग जिंकायचंय का तुम्हाला आईच्या पायावर डोकं ठेवा.

Web Title: Sankarshan Karhade Emotional Poem For Mother Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.