एकेकाळी संकर्षणवर आलेली पैसे उधार घेण्याची वेळ; स्ट्रगल काळात शिक्षकांनी केलेली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 12:55 PM2022-04-13T12:55:36+5:302022-04-13T12:56:17+5:30
Sankarshan Karhade: दिग्दर्शकांना पैसे परत देता यावेत यासाठी संकर्षणला मोठा संघर्ष करावा लागला.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, कवी आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून नाव कमावणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade). आपल्या कलागुणांमुळे संकर्षण अल्पावधीत लोकप्रिय झाला. त्यामुळे आज त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफ जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक असतात. विशेष म्हणजे आज प्रसिद्ध, यश उपभोगणाऱ्या संकर्षणचा हा प्रवास सोपा नव्हता. अलिकडेच त्याने सिनेपत्रकार, समिक्षक सौमित्र पोटे यांच्या 'मित्रम्हणे' या पॉडकास्टवर त्याच्या संघर्षकाळातील काही आठवणी शेअर केल्या आहेत.
२००८ मध्ये संकर्षणने त्याच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. यात त्याने सुरुवातिच्या काळा ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर त्याची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. परंतु, या क्षेत्रातील त्याचा सुरुवातीचा काळ चांगलाच खडतड होता. विशेष म्हणजे एकेकाळी त्याला चक्क दिग्दर्शकांनाच ११ हजार रुपये द्यावे लागले होते. परंतु, या संकट काळात त्याला त्याच्या परभणीच्या एका शिक्षकांनी मदत केली होती.
'तुक्या तुकविला नाग्या नाचविला' या चित्रपटामध्ये संकर्षणने ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं. या चित्रपटात अभिनेता अभिनेता पुष्कर जोगच्या पाठीमागे घोषणा देणाऱ्यांमध्ये संकर्षण झळकला होता. त्यामुळे सहाजिकच चित्रपटात कोणतीही भूमिका केल्यावर कलाकारांना त्याचं मानधन मिळतं. मात्र, संकर्षणच्या बाबतीत ही गोष्ट उलटी घडली. या चित्रपटात संकर्षणला पैसे मिळण्याऐवजी त्यालाच दिग्दर्शकाला ११ हजार रुपये द्यावे लागले होते. याविषयी त्याने पॉडकास्टमध्ये सविस्तरपणे घडलेला प्रसंग सांगितला.
"परभणीला माझ्या शिक्षकाकडून उधार घेऊन ते पैसे मी दिग्दर्शकाला दिले होते. सच्चिदानंद खडके असे त्या शिक्षकाचे नाव आहे. मला संध्याकाळी ६.३० ला फोन आला की उद्या गोरेगाव फिल्मसिटीला शूट आहे. मी रात्री देवगिरी एक्स्प्रेसने निघालो. माझ्याकडे तिकीट नव्हते त्यामुळे रेल्वेच्या दरवाज्यात उभा राहून प्रवास केला. सकाळी सेटवर पोहचलो. काम करताना पडलो त्यामुळे हनुवटीला ४ टाके पडले. डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी हनुवटीला स्टेपलरच्या पिन मारल्या. नंतर परत दिग्दर्शकांकडे गेलो त्यांना पैसे आणि फोटो दिले आणि परभणीला परतलो," असं संकर्षणने सांगितलं.
दरम्यान, सध्या संकर्षण माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत समीर ही भूमिका साकारत आहे. सोबतच किचन कल्लाकार या शोमध्येही तो सूत्रसंचालकाची भूमिका साकारत आहे. संकर्षण मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. इतंकच नाही तर तो इन्स्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.