दुपारी 12 वाजता नव्हे तर सकाळी 8 वाजता जेवतो संकर्षण; जाणून घ्या त्यामागचं भन्नाट कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 06:11 PM2023-03-28T18:11:10+5:302023-03-28T18:15:00+5:30
Sankarshan karhade: कलाविश्वात सक्रीय असलेल्या संकर्षणने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या जेवणाच्या सवयीबाबत एक किस्सा सांगितला.
अभिनेता, लेखक, कवी अशा विविधांगी भूमिका यशस्वीपणे पार पाडणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. यशाचं उंच शिखर गाठल्यानंतरही संकर्षणचे पाय अजूनही जमिनीवर असल्याचं दिसून येतं. त्यामुळे त्याचा हाच साधेपणा चाहत्यांना आवडतो. संकर्षण सोशल मीडियावर सक्रीय असून त्याच्या जीवनातील किस्से, आठवणी, प्रसंगी तो कायम शेअर करत असतो. यावेळी त्याने त्याच्या जेवणाचा किस्सा शेअर केला आहे.
कलाविश्वात सक्रीय असलेल्या संकर्षणने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या जेवणाच्या सवयीबाबत एक किस्सा सांगितला. संकर्षण वयाच्या ७ व्या वर्षापासून चक्क सकाळी ८ वाजता जेवतो.
"सुप्रभात ..मी तुम्हाला आज एक गंमत सांगतो.. मी वयाच्या ७ व्या वर्षी पासून आजपर्यंत रोज सकाळी ८३० वा. जेवतो.. पोट्टभर.. माझे बाबा बॅंकेत होते.. आता रिटायर्ड झाले. ते बरोब्बर ८.४० ला घरातून निघायचे.. कध्धी त्यांची वेळ चूकली नाही.. आणि ८.३० ला पान वाढायची माझ्या आईची वेळ कधी चूकली नाही", असं संकर्षण म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "आजही शूट असेल, नसेल .. सकाळी लवकर जायचं असेल नसेल.. मला सकाळी ८.३० झाले कि पोटभर भूक लागते.. आणि मी पोटभर जेवतोच..आज आईने साधं वरण भात.. हिरव्या टोमॅटोची भरलेली भाजी.. वांग्याचं भरीत .. वाढलं.. अहो काय सांगु कसं वाटलं.. मनसोक्तं हानलं बघा .. माझ्या आईच्या हातचं काहीही अप्रतिमच लागतं.. सहज शेअर करावं वाटलं".
दरम्यान, या पोस्टसोबत संकर्षणने त्याच्या जेवणाच्या ताटाचाही फोटो शेअर केला आहे. संकर्षणच्या या पोस्टवर सध्या नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. सोबतच तुझा हाच साधेपणा आम्हाला आवडतो असंही अनेकांनी म्हटलं आहे.