"चंद्रभागेच्या काठी त्याची ८० वर्षांची आई हरवली...", संकर्षणने सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 10:20 AM2024-07-16T10:20:24+5:302024-07-16T10:21:09+5:30
Ashadhi Ekadashi 2024 : "माझे बाबा दरवर्षी पंढरपूरला सेवा करण्यासाठी जातात...", संकर्षणने सांगितलेला प्रसंग ऐकून अंगावर काटा येईल
संकर्षण कऱ्हाडे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून त्याने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अभिनयाबरोबरच संकर्षण त्याच्या साध्या आणि सरळ स्वभावामुळे प्रेक्षकांची मनं जिंकून घेतो. सध्या संकर्षण ड्रामा ज्युनियर्स या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. या शोमध्ये संकर्षणने आषाढी एकादशीची एक आठवण आणि प्रसंग सांगितला आहे.
संकर्षण म्हणतो, "माझा बाबा बँकेत उत्तम नोकरी करून निवृत्त झाले. पण, दरवर्षी ते पंढरपूरला सेवेला जातात. पावती फाडा, लोकांच्या चपला नीट ठेवा, कोणाला रांग सापडत नसेल तर शोधून द्या...अशी सेवा ते करतात. मागच्या वर्षीही ते गेले होते. मी बाबांना विचारलं कसं काय बाबा पावती वगैरे फाडतात? त्यावर ते म्हणाले की आपण तिरुपती बालाजीला जातो, तिथे कोणी अंगठी, कोणी माणिक तर कोणी खडा टाकतं. पांडुरंगाच्या इथे पावत्या ११ रुपयाच्या फाडतात. ११ रुपये, २१ रुपये...माऊलीला एवढं द्या हो आमच्या...बाबा म्हणाले इतका गरीबांचा हा देव आहे. त्यानंतर त्यांनी एक अनुभव सांगितला."
"बाबा म्हणाले की संकर्षण एक मुलगा सकाळी रडत माझ्याकडे आला. मला म्हणाला, माऊली...११ रुपयाची पावती फाडा बरं. माझ्या बाबांनी त्याला विचारलं की तू रडतोस का? तो म्हणाला, अहो...पहाटे चंद्रभागेच्या काठी अंघोळीला गेलो होतो. माझी आई हरवली हो माऊली. बाबा म्हणाले कुठे हरवली आई? त्यावर तो म्हणाला की चंद्रभागेला अंघोळीला गेलेलो तिथेच गर्दीत हरवली...तुम्ही पटकन ११ रुपयांची पावती फाडा. माझ्या बाबांनी स्वत:चे १०० रुपये आणि त्याचे ११ रुपये अशी १११ रुपयांची पावती फाडली. त्याला हाताला धरून नेलं आणि म्हणाले कळस बघ...तुझी माऊली ती माझी माऊली...तुला ती सापडेल...काहीच काळजी करू नकोस. हरवलेल्या त्या माऊलीचं वय ८० वर्ष होतं. बाबांनी त्याची पावती फाडली तो निघून गेला. अर्ध्या तासांत तो आला आणि बाबांच्या पायावर डोकं ठेवलं. म्हणाला, माऊली तुमच्या शब्दात काय ताकद आहे. ही माझी आई ८० वर्षांची...", असं संकर्षणने सांगितलं.
पुढे तो म्हणाला, "आयुष्यात हरवलेल्या अनेक लोकांना सांभाळणारी ही माय, माऊली एकच आहे...पंढरीची माऊली...तो पाहिजे तेव्हा माऊली पाहिजे तेव्हा बाप आहे. असं हळवं करणारा देव जगाच्या पाठीवर कुठेही नाही. म्हणून तो लाखो वारकऱ्यांचा पोशिंदा आणि त्यांचं आशास्थान आहे. बाबा महाराज त्यांच्या किर्तनात म्हणतात, पांडुरंगाचे हात कमरेवर का आहेत...तो म्हणतोय घाबरू नको, चंद्रभागेचं पाणी कमरेएवढंच आहे. तू बुडणार नाहीस...".