संकर्षण कऱ्हाडेचा भाऊचं नाही तर वडीलदेखील आहेत अभिनेते, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 07:00 AM2022-12-02T07:00:00+5:302022-12-02T07:00:00+5:30
Sankarshan Karhade : अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. संकर्षणच्या आजवरच्या प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे. त्याच्या पावलावर पाऊल टाकत संकर्षणचा धाकटा भाऊ अधोक्षज हा देखील अभिनय क्षेत्रात दाखल झाला. मालिका, नाटकातून तो हळूहळू आपला जम बसवताना दिसतो आहे. नुकतीच अधोक्षजने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या सेटवर हजेरी लावली होती. अर्थात त्याला कारणही तेवढंच खास होतं. आपला भाऊ ज्या मालिकेत काम करतो त्याच मालिकेत त्याचा आवडता अभिनेताही काम करतो हे त्याच्यासाठी खूप खास ठरले.
अधोक्षज हा श्रेयस तळपदेचा खूप मोठा चाहता आहे.आणि याच निमित्ताने त्याने मालिकेच्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी श्रेयसला पाहून आपल्या भावना त्याने सोशल मीडियावर व्यक्त केल्या. यावेळी त्याने बाबांच्याही आठवणींचा खजिना उलगडला. अधोक्षज म्हणाला की, २००५ साल. मी नुकताच नववी पास करून दहावीच्या वर्गात गेलो होतो. तेव्हा बाबा बँकेत काम करत करत प्रायोगिक नाटकात आणि कधीकधी मराठी पिक्चरमध्ये काम करायचे. मला आठवतंय, एकदा बाबा रजा घेऊन आठ दिवसांसाठी मुंबईला एका मराठी पिक्चरच्या शूटिंगसाठी गेले होते. पिक्चरचं नाव होतं ‘झुळूक’. त्यावेळी पिक्चर, शूटिंग ह्या सगळ्या गोष्टींचा खूप अप्रूप वाटायचं ( ते आजही आहेच). ‘आपले बाबा पिक्चर मध्ये काम करत आहेत’ ही फिलिंगच खूप भारी होती. मुंबईला गेल्यावर बाबांचा फोन आला, त्यांच्याकडून कळालं की पिक्चरमध्ये डॉक्टर गिरीश ओक, ऐश्वर्या नारकर आणि श्रेयस तळपदे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. त्यावेळी श्रेयस तळपदे हे नाव माझ्यासाठी अगदीच नवीन होतं. बाबा तेव्हा बरेचदा सांगायचे, श्रेयस तळपदे शूटिंग दरम्यान बॉलिंगची प्रॅक्टिस करायचा. त्यानंतर काहीच महिन्यांनी श्रेयस तळपदेचा ‘इक्बाल’ नावाचा सिनेमा रिलीज झाला, तेव्हा ती प्रॅक्टिस कशासाठी होती, ते समजलं! ‘इक्बाल’ पाहिला आणि तेव्हापासून मी त्याचा फॅन झालो. त्या दरम्यान मीसुद्धा क्रिकेट खेळायचो. त्यामुळे त्याची भूमिका मला जास्तच जवळची वाटत होती.
तो पुढे म्हणाला की, तेव्हापासून आजपर्यंत माझ्या दिवसाची सुरुवात त्याच्या आशाये गाण्यानं होते. नंतरही त्याचं प्रत्येक काम मी मन लावून पाहिले. माझ्या बाबांनी इतक्या मोठ्या कलाकारासोबत काम केले हे फिलिंग खूप भारी होते. मला पण कधीतरी त्याला भेटता यावं अशी इच्छा तेंव्हापासून मनामध्ये होती. ‘इक्बाल’नंतर मात्र तो हिंदी चित्रपटसृष्टीतच जास्त कार्यरत राहिला आणि अनेक वर्षं त्याला भेटण्याची इच्छा फक्त इच्छाच राहिली.
मग अखेर पंधरा वर्षांनंतर, संकर्षणच्या निमित्तानं, ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या सेटवर ‘दि श्रेयस तळपदे’च्या भेटीचा योग आला. त्याची रुबाबदार व्यक्तिमत्त्व, त्याची स्माईल आणि त्याचा साधेपणा याचं कॉम्बिनेशन पाहून मला खूप छान वाटले आणि त्याचा ऑटोग्राफ घेण्याचा मोह आवरला नाही. ही त्याची आणि माझी पहिली भेट. पुढे आमच्या घरगुती समारंभाचा भाग होण्याइतका तो जवळचा झाला आणि पर्यायाने ‘दि श्रेयस तळपदे’चा ‘श्रेयस दादा’ झाला. भविष्यात त्याच्यासोबत कामं करण्याचीही संधी मिळेल, या ‘आशाये’ आहेतच, पण ही भेट खूप खास होती, हे मात्र खरं! Love you श्रेयस दादा अशीच मस्त मस्त कामं करत रहा. अशीच प्रेरणा देृत रहा!