'साराभाई VS साराभाई' फेम राजेश कुमारचं निघालं दिवाळं, अभिनय सोडून शेतीकडे वळला पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 01:30 PM2023-11-23T13:30:45+5:302023-11-23T13:32:12+5:30
२० एकर जमिनीत १५ हजार झाडं लावली मात्र एका पुरात सगळं वाहून गेलं.
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय विनोदी मालिका 'साराभाई व्हर्सेस साराभाई' (Sarabhai VS Sarabhai) चा वेगळा चाहतावर्ग आहे. 2004 साली आलेल्या मालिकेने सर्वांना खळखळून हसवलं. मोनिशा, माया, साहील आणि रोसेश या मुख्य पात्रांनी मालिकेत रंगत आणली होती. नुकतंच मालिकेच्या कलाकारांचं रियुनियनही झालं. आता नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, रोसेशचं पात्र साकारणाऱ्या अभिनेता राजेश कुमारचं (Rajesh Kumar) दिवाळं निघालं आहे. अभिनय सोडल्यानंतर त्याने शेती करण्याचा निर्णय घेतला मात्र आता तो कर्जात बुडाला आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत राजेश कुमार म्हणाले, "२०१७ मध्ये मी अभिनयाला रामराम केला. मला शेती करायची असल्याचं मी वडिलांना सांगितलं. त्यांनी ते मान्यही केलं. मला वाटलं की अभिनेता म्हणून माझी काहीच प्रगती होताना दिसत नाही. मात्र शेती क्षेत्रात मी अगदीच नवखा होतो. मी सलग पाच वर्ष शेती केली.मात्र त्यातही माझं असं काही नुकसान झालं जसं काय निसर्ग माझ्याशी खेळ खेळत आहे. मी २० एकर जमिनीत १५ हजार झाडं लावली मात्र एका पुरात सगळं वाहून गेलं. चार वर्षानंतर कोरोना आला. माझी आर्थिक परिस्थिती बिकट होती. लॉकडाऊनमध्ये माझं सेव्हिंगही संपलं. माझा खिसा रिकामा होता आणि डोक्यावर कर्ज होतं."
ते पुढे म्हणाले,"दरम्यान मला एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा तुम्ही स्वत:बद्दल विचार करणं सोडाल तेव्हा तुम्ही दुसऱ्यांचा विचार करु शकाल. आणि तेव्हाच दुसरेही तुमचा विचार करतील. हे एक चक्र आहे.काही मिळवायचं असेल तर स्वत:बद्दल सोडून इतरांचा विचार करायला हवा. माझ्या मुलांना माझा एक अभिनेता आणि एक शेतकरी या दोन्ही नात्याने गर्व वाटतो."