'आई कुठे काय करते' बंद होणार?; प्रेक्षकांचा संताप पाहून सतीश राजवाडे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 04:59 PM2024-03-14T16:59:25+5:302024-03-14T17:01:01+5:30
काय म्हणाले चॅनल हेड सतीश राजवाडे?
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) बऱ्याच वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मधुराणी प्रभुलकरने मालिकेत मुख्य भूमिका साकारली. तसंच मालिकेतील इतरही पात्र गाजली. सुरुवातीला मालिकेत आई या पात्राला ज्या पद्धतीने दाखवण्यात आलं ते प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. पण आता मात्र मालिकेने घेतलेलं वळण प्रेक्षकांना पटलेलं नाही. अनेक प्रेक्षकांनी मालिका पाहणंच सोडलं. त्यामुळे आता मालिका बंद होणार का असाही संभ्रम निर्माण झाला. मात्र या सर्व चर्चांवर स्टार प्रवाहचे चॅनल हेड सतीश राजवाडे (Satish Rajwade) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेत सध्या एक ट्विस्ट आलाय. आशुतोषचं निधन झालं असून त्याच्या आईने अरुंधतीलाच त्याच्या निधनाला जबाबदार धरलं आहे. तर अरुंधती आता पुन्हा अनिरुद्धच्या घरी म्हणजेच तिच्या पूर्वीच्या सासरी आली आहे. तिला घेऊन यायला चक्क कांचन आजी आल्या आहेत. मालिकेतला हा ट्विस्ट पाहून प्रेक्षकांचं मात्र संताप झाला आहे. बंद करा मालिका अशा प्रतिक्रिया येत असतानाच सतीश राजवाडे म्हणाले, "सध्या मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षक बरंच काही बोलत आहेत. तो त्यांचा हक्कही आहेच. याच प्रेक्षकांनी मालिका सुपरहिट केली होती. त्यामुळे हे प्रेक्षक मालिकेला नावंही ठेवूच शकतात. पण मला खात्री आहे मालिकेतलं हे वळणं प्रेक्षकांना नंतर नक्कीच आवडेल."
ते पुढे म्हणाले, "ही मालिका आणखी प्रगल्भ करण्यासाठी हे वळण आणणं गरजेचं होतं. आपल्याला आईची गरज असते पण आईला जेव्हा गरज असते तेव्हा तिच्यासाठी कोण असतं. प्रेक्षकांनी जरा संयम ठेवा आणि मालिका जशीजशी पुढे जाईल त्यावरुन आम्ही जे करतोय ते बरोबर आहे की नाही हे ठरवा."