सविता मालपेकरांची सेटवर या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालेली मारामारी, अभिनेत्रीनेच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 02:04 PM2024-11-16T14:04:32+5:302024-11-16T14:05:22+5:30
Savita Malpekar: सविता मालपेकरांचे या अभिनेत्रीसोबत अजिबात पटायचे नाही आणि एकदा त्यांचे रुपांतर मारामारीत झाले होते. याबाबतचा खुलासा त्यांनी मुलाखतीत केला.
अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री. त्यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत काम केले आहे. त्या बेधडक अंदाजासाठी ओळखल्या जातात. त्यांनी इंडस्ट्रीत अनेक दिग्गज कलाकारांपासून आताच्या कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांना या कलाकारांसोबत आलेल्या अनुभवाबद्दल लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात बोलताना त्यांनी एका सेटवर अभिनेत्रीसोबत झालेल्या मारामारीचा किस्सा शेअर केला.
सविता मालपेकर यांनी नुकतेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या बालपणापासून करिअरमधील पदार्पण, अनुभव अशा बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. त्यांनी यावेळी मराठी इंडस्ट्रीतल्या कलाकारांबद्दल बोलताना त्यांचा एका अभिनेत्रीसोबत सेटवर झालेल्या मारामारीबद्दल खुलासा केला. त्यांनी सांगितले की, ज्यांच्यासोबत मी काम केले त्यात फैयाज सोडली तर मला कोणाचा वाईट अनुभव आला नाही. ज्यांच्या ज्यांच्या बरोबर मी कामे केली आहेत मग ते पुरूष नट असू देत किंवा ह्या सगळ्या काम करणाऱ्या. फैयाज यांच्यासोबत का पटत नव्हतं असं विचारल्यावर त्या म्हणाल्या की, स्वतःच्या सौंदर्याविषयी अहंकार किंवा इतर गोष्टींविषयी..नेमका तिचा काय प्रॉब्लेम होता हे माहित नाही. पण तिला मला त्रास द्यायला आवडायचा.
त्या पुढे म्हणाल्या की, ते काय असतं माहिती आहे ना तुला, एकतर मी सविता मालपेकर, त्यातून कोकणातून आलेली मी... उगाचंच शेपटीवर कुणी पाय दिला तर मी गप्प बसणार नाही. मग तिच शेपटी फिरवायची. जेव्हा आपल्याला वाईट अनुभव येतो. तेव्हा तू निर्मात्यांना जाऊन सांगणार ना की, सवितापासून मला लांब ठेवा. आम्हाला एकत्र ठेवू नका. एकत्र ठेवलात तर कधीतरी मारामाऱ्या होतील. ते निर्मात्याने ऐकलं पाहिजे की नाही. आमच्या निर्मात्याने तेव्हा ऐकलं नाही आणि मारामाऱ्या झाल्या. मी हे पहिल्यांदा ऑनस्क्रीन बोलतेय. ती दिग्गज अभिनेत्री आहे. त्यावेळेला ते झालं. तेव्हा मी तरूण होते. त्यामुळे तुम्हाला आलेल्या अनुभवाशिवाय कोणाबद्दल वाईट बोलू नका, असे मी सातत्याने सांगते आहे.