शेवटचं शूट म्हणत मालिकेला निरोप देताना 'माझी तुझी रेशीमगाठ'मधील वहिनी झाली भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 04:24 PM2023-01-09T16:24:49+5:302023-01-09T16:25:09+5:30
या आठवड्यात माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचे शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण होणार आहे. नुकतेच या मालिकेतील मीनाक्षी मामी म्हणजेच अभिनेत्री स्वाती देवल हिने मालिकेचा निरोप घेतला आहे.
झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका दाखल होत आहे. ३६ गुणी जोडी या नव्या मालिकेतून अनुष्का सरकटे आणि आयुष संजीव प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. या मालिकेत दोन भिन्न टोकाची मनं जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय घडते याचा अंदाज तुम्हाला मालिकेच्या प्रोमोमधून आलाच असेल. येत्या २३ जानेवारी २०२३ पासून संध्याकाळी ६.३० वाजता ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. त्यामुळे माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे. या आठवड्यात माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचे शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण होणार आहे. नुकतेच या मालिकेतील मीनाक्षी मामी म्हणजेच अभिनेत्री स्वाती देवल हिने मालिकेचा निरोप घेतला आहे. आपले अखेरच्या भागाचे शूटिंग आटोपून ती मालिकेतील कलाकारांना तसेच प्रेक्षकांना भावनिक निरोप देताना दिसत आहे.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहाच्या वाहिनीची भूमिका स्वाती देवलने साकारली होती. ही भूमिका ग्रे शेड होती. त्यामुळे स्वातीला प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जावे लागत होते. या भूमिकेमुळे आपल्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली असे स्वाती सांगते. मात्र आता मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने शेवटच्या दिवसात तिचे पात्र सकारात्मक दाखवण्यात आले आहे याचसाठी तिला पुन्हा एकदा मालिकेत बोलावण्यात आले आहे. या मालिकेतील अखेरचे शूटिंग आटोपून स्वाती प्रेक्षकांना निरोप देताना भावुक झाली आहे. पुढच्या आठवड्यात २१ जानेवारीला या मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट केला जाणार आहे. त्यामुळे एकेक पात्रांची मालिकेतून एक्झिट होत आहे.
नुकत्याच पाहायला मिळालेल्या भागात शेफाली अनुष्काला नेहाच्या घरी घेऊन जाताना दिसली. तिथे अनुष्काला पूर्वायुष्यातील काही घटनांचा उलगडा होतो. त्यामुळे मालिकेत लवकरच नेहा परतणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत.