शक्ति मोहनने माधुरी दीक्षितला केले चकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 20:20 IST2019-01-09T20:19:13+5:302019-01-09T20:20:27+5:30
शक्ति मोहनने माधुरीच्या धक धक करने लगापासून घागरापर्यंत काही अतिशय गाजलेल्या गाण्यांवर नृत्य सादर केले आणि आपल्या अप्रतिम पदन्यासाने माधुरीबरोबरच प्रेक्षकांनाही मोहित केले.

शक्ति मोहनने माधुरी दीक्षितला केले चकीत
माधुरी दीक्षितप्रमाणे अप्रतिम, लयदार नृत्य दुसरे कोणीच करू शकत नाही. नर्तकांतील नृत्यगुणांची दखल घेऊन त्यांना करणाऱ्या ‘स्टार प्लस’वरील ‘डान्स+’ या कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीत हिंदी चित्रपटसृष्टीतील ही एके काळची महानायिका नुकतीच सहभागी झाली होती. आपल्या प्रत्येक नव्या भूमिकेत आधीच्या भूमिकेपेक्षा उत्कृष्ट कामगिरी करणारी ही धक धक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षित यावेळी मात्र विख्यात नृत्यदिग्दर्शिका शक्तिमोहनची कामगिरी पाहून चकित झाली. शक्तिमोहनने आपल्या या प्रेरणास्थानाला नृत्यांजली वाहिली होती.
यावेळी शक्ति मोहनने माधुरीच्या धक धक करने लगापासून घागरापर्यंत काही अतिशय गाजलेल्या गाण्यांवर नृत्य सादर केले आणि आपल्या अप्रतिम पदन्यासाने माधुरीबरोबरच प्रेक्षकांनाही मोहित केले. आपली आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यासमोर आपले नृत्य सादर करण्याची संधी मिळाल्यामुळे आनंदित झालेल्या शक्तिमोहनने सांगितले, “माधुरी मॅडम या माझ्या निव्वळ प्रेरणास्रोत नसून त्यापेक्षाही अधिक काही आहेत. मी अगदी लहान असल्यापासून त्यांचं काम आणि नृत्य बघत आले आहे. या कार्यक्रमात माधुरी मॅडम येणार आहेत, हे मला समजल्यावर मला त्यांच्यासाठी नृत्य करण्याची इच्छा झाली. पण त्यांच्यासारख्या नृत्यनिपुण नर्तिकेसमोर मला नृत्य सादर करायचं आहे, या कल्पनेनं माझं हृदय धडधडत होतं. मी मनातून धास्तावले होते. त्यामुळे माझं नृत्य करताना मी एकदाही त्यांच्याकडे पाहिलं नाही. कारण त्यांना पाहिल्यावर मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले असते आणि माझं नृत्य विसरले असते, अशी भीती मला वाटली. त्यांच्याच समोर त्यांच्या गाजलेल्या गाण्यांवर नृत्य करणं हा माझा गौरव आहे, असं मला वाटतं आणि त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते.”
शक्तिमोहनचे नृत्यकौशल्य पाहून खुश झालेल्या माधुरी दीक्षितने सांगितले, तिच्या या अप्रतिम कामगिरीने मी चकित झाले असून मला ते फारच आवडले. इतके बोलून माधुरीने उभे राहून शक्तिमोहनच्या बहारदार नृत्याला मानवंदना दिली. आपले दैवत आणि अत्यंत आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षितकडून इतके कौतुक झाल्यवर स्वाभाविकच शक्तिमोहनला
स्वर्ग दोन बोटेच उरला होता.