शक्ती मोहनला डान्सिंग नव्हे तर या क्षेत्रात करायचे होते करियर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 04:17 PM2018-10-01T16:17:24+5:302018-10-02T08:30:00+5:30
शक्ती मोहनला आयएएस अधिकारी व्हायचं होतं आणि नृत्याबद्दलही तिला तितकीच आस्था होती. अभ्यास आणि नृत्य या दोन्ही क्षेत्रात ती हुशार असल्याने कोणता व्यवसाय स्वीकारावा, याचा निर्णय होत नव्हता.
उत्कृष्ट आणि यशस्वी नर्तकी आणि ‘स्टार प्लस’वरील ‘डान्स+’ या नृत्यविषयक रिअॅलिटी कार्यक्रमातील एक कॅप्टन असलेली शक्तिमोहनला आयएएस अधिकारी होण्याची इच्छा होती, या गोष्टीवर सध्या फार कोणी विश्वास ठेवणार नाही. स्वत: शक्तिमोहननेच आपल्याबद्दल ही आजवर अज्ञात असलेली माहिती उघड केली आहे. आपल्या वडिलांनी आपल्याला दिलेला सल्ला मानल्यामुळेच आज आपण एक यशस्वी नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध झालो आहोत, अन्यथा आपण एक आयएएस अधिकारी म्हणून काम करत असतो, असे ती म्हणाली. शक्ती मोहनने सांगितले, “माझं पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर कोणत्या क्षेत्रात कारकीर्द करायची, यावर मी विचार करीत होते. मला आयएएस अधिकारी व्हायचं होतं आणि नृत्याबद्दलही मला तितकीच आस्था होती. अभ्यास आणि नृत्य या दोन्ही क्षेत्रात मी तशी हुशार असल्याने कोणता व्यवसाय स्वीकारावा, याचा निर्णय होत नव्हता. तेव्हा मी माझ्या वडिलांचा सल्ला घेण्याचा विचार केला. माझी बहीण नीतीमोहन ही एक यशस्वी गायिका बनली होती. माझ्या वडिलांना मी उत्कृष्ट नृत्यांगना व्हावं, असं वाटत असलं, तरी त्यांनी मला आपलं मत बोलून दाखविलं नाही. त्यांनी आजवर मला निर्णयाचं स्वातंत्र्य दिलं असून माझ्या कोणत्याही निर्णयाला त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला होता. त्यांचं म्हणणं होतं की मी माझ्या मनाचा कौल घ्यावा. तसंच यशस्वी होण्यासाठी इतरांपेक्षा मी स्वत:शीच स्पर्धा करावी.
शक्ती पुढे सांगते, “माझ्या वडिलांनी त्यांची आवड माझ्यावर कधी लादली नाही आणि मी एखादा सुरक्षित आणि स्थिर व्यवसाय कारकीर्द म्हणून स्वीकारावा, असं मला त्यांनी कधीच सांगितलं नाही. माझी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी लागणारा पाठिंबा आणि विश्वास त्यांनी मला मिळवून दिला आणि म्हणूनच नृत्य दिग्दर्शनाच्या क्षेत्रात कारकीर्द करण्यासाठी मी मुंबईत आले. मी अभिमानानं सांगते की, माझ्या जीवनातील ‘प्लस’ हे माझे वडील आहेत. त्यांनी केवळ मलाच नाही, तर माझ्या सर्व बहिणींनाही त्यांच्या मनाप्रमाणे व्यवसाय स्वीकारण्यास प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला होता. आज पालक जेव्हा सांगतात की, त्यांना त्यांची मुलगी माझ्यासारखी व्हावी असं वाटतं, तेव्हा मला माझ्या वडिलांची तीव्र आठवण येते.”