‘शक्तिमान’ या चित्रपटात दिसणार का किलविश, कपाला? 25 वर्षांनंतर हे कलाकार काय करतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 05:30 PM2022-02-11T17:30:35+5:302022-02-11T17:31:10+5:30
Shaktimaan : ‘शक्तिमान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘शक्तिमान’ या चित्रपटाची कथा काय असेल? किलविश, कपाला, शलाका, डॉ. जैकाल हेही या सिनेमात दिसणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
90च्या दशकातील दूरदर्शन वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘शक्तिमान’ (Shaktimaan). या सुपरहिरो मालिकेने अगदी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेड लावलं होतं. आता हाच सुपरहिरो चाहत्यांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘शक्तिमान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. तीन पार्टमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, यात बॉलिवूडच्या एखाद्या बड्या सुपरस्टारला कास्ट केलं जाणार आहे. त्याचं नाव अद्याप जाहिर झालेलं नाही. पण चाहत्यांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे.
‘शक्तिमान’ या चित्रपटाची कथा काय असेल, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. शिवाय किलविश, कपाला, शलाका, डॉ. जैकाल हेही या सिनेमात दिसणार का? याचीही उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
याचनिमित्ताने ‘शक्तिमान’ या मालिकेतील स्टारकास्ट आज 25 वर्षांनंतर काय करते, कुठे आहे, हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल, आज आम्ही त्याबद्दल सांगणार आहोत.
‘शक्तिमान’ मुकेश खन्ना
गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री ऊर्फ शक्तीमानची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी वयाची साठी कधीच ओलांडलीय. 2005 ‘शक्तिमान’ ही मालिका संपल्यानंतर मुकेश खन्ना अनेक शो व चित्रपटांत दिसले. त्यांचे स्वत:चे एक युट्यूब चॅनल आहे. सध्या ते त्यामुळेच चर्चेत असतात.
वैष्णवी महंत- गीता विश्वास
‘शक्तिमान’ या मालिकेत शक्तीमानच्या प्रेमिकेच्या भूमिकेत वैष्णवी दिसली होती. ‘शक्तिमान’नंतर तिने टशन-ए-इश्क, सपने सुहाने लडकपन के या मालिकांमध्ये काम केले. 2019 मध्ये ‘दोस्ती के साइड इफेक्ट्स’या चित्रपटात ती दिसली होती.
ललित परिमू - डॉक्टर जैकाल
‘शक्तिमान’ या मालिकेत सर्वात शक्तीमाननंतर सर्वात गाजलेली भूमिका म्हणजे डॉक्टर जैकाल. ललित परिमू यांनी ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे. ललित परिमू चित्रपटांत छोट्यामोठ्या भूमिका साकारताना दिसतात. गेल्या काही वर्षांत शाहिद कपूरच्या हैदर, सैफच्या एजंट विनोद या चित्रपटांत दिसले. अलीकडे कांचली या सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली होती.
अश्विनी काळसेकर - शलाका
अश्विनीने या मालिकेत काळी मांजर शलाकाची भूमिका साकारली होती. अश्विनी छोट्या पडद्यावर निगेटीव्ह भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे. अश्विनी आता चित्रपटांना अधिक प्राधान्य देते. अलीकडे सुभाष घई यांच्या ‘36 फार्म हाऊस’ या ओटीटीवर रिलीज सिनेमात ती दिसली होती. त्याआधी अक्षय कुमारच्या लक्ष्मी आणि रणवीर सिंगच्या सिम्बा या सिनेमाही तिने भूमिका साकारली होती.
सुरेंद्र पाल - तमराज किलविश
‘अंधेरा कायम रहे’ असं अजूनही अधूनमधून तुम्ही ऐकत असाल किंवा स्वत: म्हणत असाल. ही टॅगलाईन ज्यांच्यासाठी होती त्या तमराज किलविशची भूमिका सुरेंद्र पाल यांनी साकारली होती. सुरेंद्र पाल यांनी या मालिकेत फारच मस्त काम केलं होतं. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही देण्यात आले होते. ‘शक्तिमान’नंतर सुरेंद्र पाल अनेक मालिकेत दिसले. सध्या ते भोजपुरी चित्रपटांत अधिक अॅक्टिव्ह आहेत.
नवाब शाह - मेजर जेजे
अभिनेता नवाब शाह याने ‘शक्तिमान’ मालिकेत मेजर जेजेची भूमिका साकारली होती. तमराज किलविशचा भक्त असलेला नवाब शाह अलीकडे ब-याच सिनेमात झळकला. टायगर जिंदा है, दबंग 3, पानीपत, खुदा हाफिज असे अनेक सिनेमे त्याने केले. अभिनेत्री पूजा बत्रासोबत लग्न करून काही वर्षांपूर्वी चर्चेत आला होता.
फकीरा -कपाला
शक्तिमानच्या नाकीनऊ आणणा-या तांत्रिक कपालाची भूमिका फकीरा नावाच्या अभिनेत्याने साकारली होती. सध्या तो काय करतो, कुठे आहे, याबद्दल काहीही माहिती नाही.
राम सेठी- न्यूज एडिटर
गीता विश्वास ज्या वृत्तपत्रात काम करते, त्या वृत्तपत्राच्या संपादकाची भूमिका राम सेठी यांनी साकारली होती. राम सेठी आत्ता 83 वर्षांचे आहेत. वर्सोवा, मुंबईत राहतात. या वयातही ते स्क्रीनप्ले रायटर, कंसल्टिंग डायरेक्टर म्हणून सक्रीय आहेत.
किशोर भानुशाली -नवरंगी चोर
शक्तिमान मालिकेत एक नवरंगी चोरही होता. किशोर भानुशाली यांनी ही भूमिका साकारली होती. सध्या किशोर ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत काम करत आहेत.
महागुरू- टॉम ऑल्टर
शक्तिमानच्या महागुरूंची भूमिका साकारणारे टॉम ऑल्टर आता या जगात नाहीत. 2017 साली कॅन्सरने त्यांचं निधन झालं. 2019 साली त्यांचा किताब हा अखेरचा सिनेमा रिलीज झाला होता. हा एक लघुपट होता.