शरद केळकरचं ८ वर्षांनी टीव्हीवर कमबॅक, गाजलेल्या मराठी मालिकेच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 12:06 IST2025-03-06T11:54:41+5:302025-03-06T12:06:24+5:30
शरद केळकरसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार

शरद केळकरचं ८ वर्षांनी टीव्हीवर कमबॅक, गाजलेल्या मराठी मालिकेच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार
भारदस्त आवाज, दमदार शरीरयष्टी आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेता शरद केळकरने (Sharad Kelkar) आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. शरदने हिंदी मालिका, चित्रपट, मराठी सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमात काम केलं आहे. २००४ पासून शरद केळकर हिंदी मालिकांमध्ये झळकत आहे. २१०७ साली आलेल्या 'कोई लौट के आया है' मालिकेत तो शेवटचा दिसला. आता ८ वर्षांनी शरद केळकर पुन्हा टीव्हीवर कमबॅक करत आहे.
झी टीव्हीवर 'तुम से तुम तक' मालिका लवकरच सुरु होणार आहे. यामध्ये शरद केळकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर निहारिका चौकसे ही मुख्य अभिनेत्री असणार आहे. निहारिकाने याआधी काही हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या गाजलेल्या मालिकेतही ती झळकली होती. शरद आणि निहारिकाची 'तुम से तुम तक' ही मालिका मराठीतील सुबोध भावे आणि गायत्री दातारची गाजलेली मालिका 'तुला पाहते रे' चा रिमेक असणार आहे. शरद केळकर मालिकेत मोठ्या बिझनेसमनची भूमिका साकारेल. निहारिका आणि शरद यांच्या वयातही मोठं अंतर आहे अशीच मालिकेचीही कथा आहे. शरदला इतक्या वर्षांनी पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
सुरुवातीला 'या' अभिनेत्याचा झालेला विचार
शरद केळकरच्या आधी या भूमिकेसाठी अभिनेता करण सिंह ग्रोवरचाही विचार झाला होता. त्याच्यासोबत हेली शाह झळकणार अशी चर्चा होती. करण सिंह ग्रोवरचंही हे अनेक वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक असणार होतं. मेकर्ससमोर करण सिंह ग्रोवर आणि शरद केळकर ही नावं होती. अखेर आता शरद केळकरच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
शरद केळकरने २००४ साली दूरदर्शनवरील 'आक्रोश' मालिकेतून पदार्पण केलं होतं. यामध्ये त्याने सचिन कुलकर्णी या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. नंतर तो 'सात फेरे-सलोनी का सफर', 'बैरी पिया', 'उतरन', 'कुछ तो लोग कहेंगे' या मालिकांमध्ये दिसला. 'सात फेरे' मालिकेच्या सेटवरच त्याची ओळख कीर्ती गायकवाडशी झाली. दोघं प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नही केलं. शरद केळकर नंतर 'रामलीला', 'तानाजी', 'लक्ष्मी', 'भूज', 'एजंट राघव' यासारख्या काही सिनेमांमध्ये दिसला. तसंच मनोज वाजपेयींच्या गाजलेल्या 'द फॅमिली मॅन' सीरिजमधील त्याची भूमिकाही खूप गाजली.