लेक पायलट झाल्याची पोस्ट अन् शरद पोंक्षे झाले ट्रोल, नेटकरी म्हणाले, "तुझ्या बापाला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 10:33 AM2023-07-28T10:33:34+5:302023-07-28T10:34:31+5:30

शरद पोंक्षेंनी पोस्टमध्ये आरक्षणाचा उल्लेख केला अन् नेटकरी संतापले

sharad ponkshe trolled for his recent post on on daughter mentioning reservation topic | लेक पायलट झाल्याची पोस्ट अन् शरद पोंक्षे झाले ट्रोल, नेटकरी म्हणाले, "तुझ्या बापाला..."

लेक पायलट झाल्याची पोस्ट अन् शरद पोंक्षे झाले ट्रोल, नेटकरी म्हणाले, "तुझ्या बापाला..."

googlenewsNext

मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी काल लेक पायलट झाल्याची पोस्ट केली. आर्थिक परिस्थिती, वडिलांचं आजारपण, कोरोना यावर मात करत तिने हे यश संपादन केल्याचं ते अभिमानाने म्हणाले. दरम्यान त्यांच्या पोस्टमधील एका वाक्याने मात्र सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलं. त्यांनी पोस्टमध्ये आरक्षणाचा उल्लेख केल्याने नेटकरी चांगलेच संतापले आहेत. नेटकऱ्यांनी कमेंट करत पोंक्षेंना खडेबोल सुनावले आहेत.

शरद पोंक्षे यांची पोस्ट काय आहे?

शरद पोंक्षे यांनी लेकीचे फोटो शेअर करत लिहिले, "कु सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. इयत्ता चौथीपासून तिने पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून, माझं आजारपण, कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत कोणतीही सवलत, आरक्षण नसताना केवळ मेहनत, बुध्दीमत्ता, परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली. बापाला आणखी काय हवं नाही का? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तुझा सिध्दी. मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे. करशीलच खात्रीच आहे. लव यू बाळा."

या पोस्टमधील आरक्षण नसताना केवळ बुद्धिमत्ता, परिश्रम आणि निष्ठेच्या जोरावर ती पायलट झाली या वाक्यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला. पोंक्षेंना आरक्षणवाले डोळ्यात खुपतात असं म्हणत नेटकऱ्यांनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत. 

एका युझरने लिहिले, 'सिध्दी, बेटा तुझे हार्दिक अभिनंदन ,परंतु तुझ्या बापाला आरक्षणवाले डोळ्यात खुपतात याचे वाईट वाटते ,आरक्षण घेणारे झोपडपट्टीत राहुनही कलेक्टर होतात आणि कलेक्टर होण्यासाठी फक्त आरक्षणच नव्हे तर बुद्धिमत्ताही लागते. हे पण ह्या कुंठीत बुध्दीच्या आणि मनुवादी माणसाला सांग, याच्या मते तू खडतर परिस्थिती सामना केला तर त्याला म्हणावं की जे कमावले ते का जुगारात हारला होता की दुसरे काही व्यसन होते ज्यामुळे तुला अशा खडतर परिस्थितीचा सामना करावा लागला.'

तर आणखी एकाने लिहिले, 'साधारण 2000 वर्षे शिक्षणाचा निवडक अधिकार, आरक्षण, एकाच समाजाला होतं. ह्या पेक्षा मोठं आरक्षण असूच शकत नाही कोणत्याही समाजासाठी. असो.'


 
शरद पोंक्षे नेहमी सामाजिक विषयांवर बेधडकपणे बोलतात. तसंच सावरकर विचारांचा प्रसारही करतात. त्यामुळए बऱ्याचदा त्यांचे विचार पटले नाहीत की नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. आता लेकीचं कौतुक करताना आरक्षणावर बोलायची काय गरज असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केलाय.

Web Title: sharad ponkshe trolled for his recent post on on daughter mentioning reservation topic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.