Shashank Ketkar : 'अहो, होळी अन् रंगपंचमी...', शशांकने लेखक-निर्मात्यांची दाखवली चूक; थेट कॅलेंडरचाच फोटो केला पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 12:07 PM2023-02-26T12:07:19+5:302023-02-26T12:08:15+5:30
हिंदीचं अनुकरण करणारे बजेटमध्ये तर करत नाही मग चुकांमध्ये कशाला, शशांकची जबरदस्त पोस्ट चर्चेत आहे
Shashank Ketkar : मराठी अभिनेताशशांक केतकर नेहमीच सडेतोड वक्तव्ये करतो. मग ते मालिकेचे लेखक, निर्माते किंवा दिग्दर्शकाविरोधात का असेना. त्यांची चूक जाहीरपणे लक्षात आणून देताना तो मागेपुढे पाहत नाही. याचा प्रत्यय नुकताच आला आहे. त्याने इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमधून सर्वच मराठी लेखक, दिग्दर्शकांना जाहीर सल्ला दिला आहे.
शशांक केतकरसोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सतत तो काही ना काही पोस्ट करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. त्याच्या प्रोकेट्सविषयी माहिती देत असतो. आता होळी हा सण जवळ आला आहे मात्र मालिकांमध्ये सर्रास होळी आणि रंगपंचमी हे एकाच दिवशी साजरी करत गफलत केली जाते. हीच चूक दाखवत शशांकने थेट कॅलेंडरचाच फोटो पोस्ट करत मजेशीर कॅप्शन लिहिले आहे.
शशांकने कॅलेंडरचा फोटो पोस्ट करत तीन तारखांवर सर्कल केला आहे. याखाली त्याने लिहिले,' हे तीन वेगळे सण असतात !!!!! कृपा करुन रंगपंचमीला होळी म्हणू नका...
आम्ही मराठी परंपरा जपतो असं म्हणणाऱ्या सर्व वाहिन्या, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार अशा सर्वांसाठी...
आपण हिंदीचं अनुकरण budget मध्ये करतो का??? नाही ना … मग चुकांमध्येतरी कशाला.
शशांकने ही मराठी मालिकांच्या निर्मात्यांना त्यांची चूक दाखवत शेवटी एक टोलाही लगावला आहे. यावर चाहत्यांच्या कमेंट्सही मजेशीर आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवेनेही कमेंट करत 'शेवटची ओळ' आणि हसण्याचे इमोजी वापरले आहेत. तर एका चाहत्यांची कमेंट लक्ष वेधून घेत आहे.
'आईशप्पथ... एकदम मुस्काडफोड... धारावाहीक लेखकांनी तर उत आणलाय, आणि त्यांच्या बिनडोक कल्पनांवर आक्षेप घ्यायला गेलं की चॅनेलची डिमांड सांगून मोकळे... वाटायचं की कलाकार तरी कसे असे निर्बुद्धपणे काहीही काम करतात... पण आजची ही पोस्ट आणि विशेषकरून त्यावरील उक्ती वाचून अभिमान वाटला की किमान कोणाचातरी स्वाभिमान शिल्लक आहे. वाह... एकच नंबर...'
शशांकच्या या पोस्टवर अनेकांनी सहमती दर्शवली आहे. सध्या शशांक 'मुरांबा' या मालिकेत अक्षयची भूमिका साकारत आहे. यातील रमा आणि अक्षयची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.