शिल्पा शेट्टी बाजीगर नव्हे तर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये करणार होती पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 09:00 PM2019-04-11T21:00:00+5:302019-04-11T21:00:02+5:30
शिल्पाने बाजीगर या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तिची जोडी शाहरुख खानसोबत जमली होती.
सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो सुपर डान्सर मध्ये सगळेच स्पर्धक एकाहून एक दमदार परफॉर्मन्स सादर करत आहेत. शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत असून दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी या कार्यक्रमात हजेरी लावतात. आता बॉलिवूडमधील दोन ज्येष्ठ अभिनेत्री या कार्यक्रमात उपस्थित राहाणार आहेत.
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान आणि आशा पारेखसुपर डान्सरमध्ये येऊन चिमुकल्यांच्या नृत्याचे कौतुक करणार आहेत. त्याचसोबत त्यांच्या काळातील अनेक आठवणी लहान मुलांसोबत शेअर करणार आहेत. सुपर डान्सर या कार्यक्रमाचा हा विशेष भाग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक सरस नृत्य सादर करत असून त्यांचे परफॉर्मन्स पाहून वहिदा रेहमान आणि आशा पारेख या दोन्ही अभिनेत्री प्रचंड खूश होणार आहेत.
सुपर डान्सरच्या आगामी भागात वहिदा रेहमान आणि आशा पारेख प्रेक्षकांना भूतकाळात घेऊन जाणार आहेत. त्यावेळेच्या बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी अनेक गोष्टी त्यांना सांगणार आहेत. एवढेच नव्हे तर त्यांचा बॉलिवूडमधील प्रवास कसा सुरू झाला याबद्दल देखील गप्पा मारणार आहेत. या गप्पांमध्ये या कार्यक्रमाची परीक्षक शिल्पा शेट्टी देखील तिच्या आयुष्यातील एक खास गोष्ट सांगणार आहे.
शिल्पाने बाजीगर या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तिची जोडी शाहरुख खानसोबत जमली होती. तसेच या चित्रपटात काजोल देखील मुख्य भूमिकेत होती. शिल्पाच्या या पहिल्याच चित्रपटातील अभिनयाचे कौतुक झाले होते. पण बाजीगर नव्हे तर गाता रहे मेरा दिल या चित्रपटाद्वारे शिल्पा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती असे तिनेच या कार्यक्रमाच्या दरम्यान सांगितले. पण काही कारणास्तव तो चित्रपट आलाच नाही. मात्र ती निराश झाली नाही. काहीच काळात तिला बाजीगर हा चित्रपट मिळाला आणि या चित्रपटातून तिने आपला ठसा उमटवला. आज तिने बॉलिवूडमध्ये तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे.