'लाफ्टर शेफ' आता मराठीत! 'शिट्टी वाजली रे' या नव्या रिअ‍ॅलिटी शोचा प्रोमो रिलीज, अमेय वाघ करणार सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 11:00 IST2025-04-02T11:00:20+5:302025-04-02T11:00:56+5:30

हिंदीत प्रचंड गाजलेल्या लाफ्टर शेफ या शोचा मराठी अवतार अर्थात शिट्टी वाजली रे कार्यक्रमाचा भन्नाट प्रोमो रिलीज

shitti vajali re show promo release host by amey wagh laughter shef marathi remake | 'लाफ्टर शेफ' आता मराठीत! 'शिट्टी वाजली रे' या नव्या रिअ‍ॅलिटी शोचा प्रोमो रिलीज, अमेय वाघ करणार सूत्रसंचालन

'लाफ्टर शेफ' आता मराठीत! 'शिट्टी वाजली रे' या नव्या रिअ‍ॅलिटी शोचा प्रोमो रिलीज, अमेय वाघ करणार सूत्रसंचालन

हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत 'लाफ्टर शेफ' (laughter shef) हा कार्यक्रम चांगलाच गाजला. या कार्यक्रमात टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील विविध सेलिब्रिटी स्वयंपाक करताना दिसले. याशिवाय या शोमध्ये विनोदाचीही फोडणी दिसली. आता याच  'लाफ्टर शेफ'ची थीम मराठीमध्ये दिसणार आहे. 'शिट्टी वाजली रे' (shitti vajali re) असं या कार्यक्रमाचं नाव असून या नव्या रिअॅलिटी शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोत पाहायला मिळतं की अमेय वाघ या शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

शिट्टी वाजली रे नवा रिअॅलिटी शो

स्टार प्रवाह शिट्टी वाजली रे हा भन्नाट कार्यक्रम भेटीला येणार आहे.  शिट्टी वाजली रे कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांना पदार्थ बनवण्याचा टास्क दिला जाणार आहे. मात्र तो पदार्थ बनवताना कलाकारांची कशी तारांबळ उडते हे पहाणं मजेशीर ठरणार आहे. कारण कलाकारांचं कलाकौशल्य आपण मालिका, नाटक आणि सिनेमांमधून पहातच असतो. मात्र त्यांचं आजवर कधीही न पाहिलेलं पाककौशल्य शिट्टी वाजली रे च्या मंचावरून पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर येणार आहे. थोडक्यात काय पोटभर खायला घालणारी नाही तर स्वयंपाक करता करता पोटभर हसवणाऱ्या कलाकार जोडीचा शोध हा कार्यक्रम घेणार आहे.


अमेय वाघ करणार होस्टिंग

लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ हा कार्यक्रम होस्ट करणार असून पूर्णब्रह्म या मराठी रेस्टॉरण्टच्या संचालिका जयंती कठाळे सेलिब्रिटी शेफची भूमिका पार पाडतील.  या कार्यक्रमाविषयी सांगताना अमेय वाघ म्हणाला, 'शिट्टी वाजली रे कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास १० वर्षांनंतर मी टीव्ही विश्वात पुनरागमन करतोय. स्टार प्रवाहसोबत जवळपास १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा काम करण्याचा योग जुळून आला आहे. स्टार प्रवाहच्या सुरुवातीच्या काळात मी गोष्ट एका जप्तीची नावाच्या मालिकेत काम केलं होतं. मला स्वयंपाकाची अतिशय आवड आहे. त्यामुळे शिट्टी वाजली रे कार्यक्रमासाठी विचारणा झाली तेव्हा तातडीने होकार दिला.

मला आणि माझ्या बायकोला अजिबात स्वयंपाक येत नव्हता मात्र लॉकडाऊनमुळे आम्ही दोघंही स्वयंपाक करायला शिकलो. तेव्हापासून मला स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. कुणी विश्वास ठेवणार नाही मात्र मी आता नियमित स्वयंपाक बनवतो. यानिमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट मला कळली ती म्हणजे आपली आई, मावशी, काकू, बहिण, पत्नी ज्या कुटुंबासाठी स्वयंपाक करतात, घरासाठी राबतात त्यांचं किती कष्टाचं काम आहे याची जाणीव मला झाली. शिट्टी वाजली रे कार्यक्रमात अनेक कलाकार सामील होणार आहेत. त्यांच्यासोबतची धमाल-मस्ती या मंचावर अनुभवता येणार आहे. मी या कार्यक्रमासाठी प्रचंड उत्सुक आहे अशी भावना अमेय वाघने व्यक्त केली.'

या भन्नाट कार्यक्रमात निक्की तांबोळी, विजय पाटकर, आशिष पाटील, प्रियदर्शन जाधव, माधुरी पवार, संकेत पाठक असे अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. त्यामुळे पोटभर हसायचं असेल तर शिट्टी वाजली रे कार्यक्रमाचा एकही भाग पाहायला चुकवू नका. 'शिट्टी वाजली रे' २६ एप्रिल पासून रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर बघायला मिळणार आहे.

Web Title: shitti vajali re show promo release host by amey wagh laughter shef marathi remake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.