Shiv Thakare : 'खतरो के खिलाडी' साठी शिवने २ सिनेमे नाकारले, प्रेमाविषयीही केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 04:06 PM2023-04-24T16:06:59+5:302023-04-24T16:07:54+5:30
शिवच्या करिअरचा ग्राफ उंचच उंच जात आहे.
अमरावतीचा शिव ठाकरेने (Shiv Thakare) अल्पावधीतच लाखो जणांच्या हृदयावर राज्य केलं आहे. त्याच्या साधेपणाने त्याने सर्वांचंच मन जिंकलं आहे. केवळ मराठी नाही तर हिंदी प्रेक्षकांमध्येही त्याची कमालीची क्रेझ आहे. सध्या शिवच्या करिअरचा ग्राफ उंचच उंच जात आहे. हिंदी बिग बॉस गाजवल्यानंतर शिवला अनेक ऑफर्स येऊ लागल्या आहेत. सध्या आयुष्यात घडत असलेल्या या बदलांवर शिवने दिलखुलासपणे संवाद साधला आहे.
'बिग बॉस' फेम अभिनेता शिव ठाकरेने नुकतंच एका वेब पोर्टलला मुलाखत दिली. यामध्ये त्याने सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. शिवने 'खतरो के खिलाडी' साठी दोन चित्रपटांची ऑफर नाकारली. यासोबतच त्याने आपल्या रिलेशनशिप स्टेटसवरही खुलासा केला. तो म्हणाला,'सध्या मी सिंगल आहे. माझं संपूर्ण लक्ष आता करिअरकडे आहे आणि हेच माझं प्रेम आहे. जे प्रेम करायचं होतं ते कॉलेजच्या दिवसात केलं. आता करिअर बनवण्याची वेळ आली आहे.'
विणा जगताप सोबतच्या नात्यावर शिव म्हणाला, 'माझं आयुष्य हे सर्वांसमोर खुलं आहे. प्रेम केलं तर ते खुल्लमखुल्ला करेन. लोक माझ्याबद्दल आणि माझ्या प्रेमाबद्दल काय म्हणतील याची चिंता मी करत नाही. मला काहीच भीती नाही.'
शिवला दोन मराठी चित्रपटांची ऑफर होती मात्र 'खतरो के खिलाडी 13'साठी त्याने या ऑफर्स नाकारल्या. दोन्ही सिनेमांचं शूट एप्रिल मध्येच सुरु होणार होतं. अशात तारखा जुळत नसल्याने त्याने चित्रपटाला नकार दिला.