Bigg Boss 16 : 7 महिन्यांपूर्वी आमचं ब्रेकअप झालं, परंतु आम्ही...; शिव ठाकरे अखेर वीणाबद्दल बोललाच...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 17:00 IST2022-12-08T16:57:11+5:302022-12-08T17:00:05+5:30
Bigg Boss 16, Shiv Thakare : खरं प्रेम इतक्या सहज संपत नाही, असं म्हणतात. कदाचित हेच खरं असावं. शिवला ढसाढसा रडताना पाहून वीणानेच त्याला धीर दिला होता. आता शिव वीणाबद्दल बोलताना दिसला.

Bigg Boss 16 : 7 महिन्यांपूर्वी आमचं ब्रेकअप झालं, परंतु आम्ही...; शिव ठाकरे अखेर वीणाबद्दल बोललाच...!!
बिग बॉस मराठी 2 मध्ये शिव ठाकरे ( Shiv Thakare ) आणि वीणा जगताप (Veena Jagatap ) यांचं प्रेम बहरलं होतं. इतकं की, शिवनं वीणाच्या नावाचा टॅटू काढला होता. वीणानेही शिवच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला होता. बिग बॉस मराठी संपल्यावर हे लव्ह बर्ड्स घराबाहेर आलेत आणि काहीच महिन्यांत काहीतरी बिनसलं. नेमकं काय बिनसलं हे कळायला मार्ग नाही. पण अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी चर्चेत आली. वीणानं शिवसोबतचे सगळे फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले अगदी त्याच्या नावाचा टॅटूही पुसला. अर्थात खरं प्रेम इतक्या सहज संपत नाही, असं म्हणतात. कदाचित हेच खरं असावं. शिवला ‘बिग बॉस 16’च्या (Bigg Boss 16) घरात ढसाढसा रडताना पाहून वीणानेच त्याला धीर दिला. प्लीज रडू नकोस, मी नेहमी तुझ्यासोबत आहे, असं ती म्हणाली. आता शिव वीणाबद्दल बोलताना दिसला.
होय,‘बिग बॉस 16’च्या 7 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये शिव ठाकरे वीणा जगतापबद्दल पहिल्यांदाच बोलला. ब्रेकअपबद्दलही त्याने खुलासा केला.
साजिद खान आणि टीना दत्ता यांच्याशी गप्पा मारत असताना शिव वीणाबद्दल बोलला. ‘बिग बॉस मराठीमध्ये मी वीणाच्या प्रेमात पडलो. 7 महिन्यांपूर्वी आमचं ब्रेकअप झालं होतं. परंतु आम्ही अजूनही त्यातून बाहेर आलेलो नाही. तिने सगळं काही विसरायला स्वत:ला कामात जुंपून घेतलं,’ असं शिव म्हणाला. ‘मी स्वत:ला एक वचन दिलं आहे. यापुढे कुठल्याही रिअॅलिटी शोमध्ये मी कधीही प्रेमात पडणार नाही, असं वचन मी स्वत:ला दिलं आहे. बीबी मराठीमध्ये आम्ही एकमेकांसाठी रोमँटिक गोष्टी केल्या. ब्रेकअप झालं पण अजूनही आम्ही एकमेकांना विसरू शकत नाही,’ असंही तो म्हणाला.